Saturday, 4 March 2017

आरटीई अंतर्गत 25 टक्के मोफत प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया दि.7 मार्च रोजी


उस्मानाबाद,दि.4:-बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांना विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश कोटयाची तरतूद आहे.
           वंचित ( एस.सी.एस.टी व विकलांग ) दुर्बल घटक ( ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन रुपये 1 लाखापर्यंत आहे. अशा खुल्या  प्रवर्गासह,विमुक्त व भटक्या जाती,इतर मागास, विशेष मागास व धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम, बौध्द,खिश्चन,पारसी,जैन,व शीख) यांच्यासाठी राखीव 25 टक्के आहेत.

          तरी पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी मिळणारी शाळा लॉटरी पक्रियेद्वारे निश्चित होणार आहे. त्यासाठी दि.7 मार्च  2017 रोजी विस्तार अधिकारी कक्ष, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा  परिषद उस्मानाबाद या ठिकाणी दुपारी 11.00वाजता ऑनलाईन  लॉटरी  प्रक्रिया आयोजित केली आहे.यासाठी पालकांनी उपस्थित राहावे,आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. सचिन जगताप यांनी  केले  आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.8 एप्रिल रोजी आयोजन


उस्मानाबाद,दि.4:-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हयातील सर्व न्यायालयात दि.8 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधीत पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये भु-संपादन प्रकरणे,मोटार अपघात तथा कामगार नुकसान भरपाई प्रकरणे,दिवाणी प्रकरणे,तडजोडपात्र फौजदारी, कौटुंबिक वाद,कलम 138 एन.आय.ॲक्टप्रमाणे असलेली प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे ज्यामध्ये बँकेची व नगर पालीकेची पाणीपट्टी ची प्रकरणे आदी प्रकरणे सामोपचाराने व तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात येणार आहेत.

 तरी संबंधीत पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा आणि त्यांची प्रलंबीत असलेली प्रकरणे सामोपचाराने आणि तडजोडीने मिटवून घ्यावेत, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे. 

जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाठक यांनी घेतली आढावा बैठक



उस्मानाबाद.दि.4:- प्रधान सचिव अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा  जिल्ह्याचे पालक सचिव  महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेऊन  संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या़ सूचना दिल्या .
या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते , परिविक्षाधीन जिल्हाधिकारी श्री.आयुषप्रसाद,  विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर, प्रभोदय मुळे, सचिन बारावकर, जिल्हा पूरवठा अधिकारी अरविंद लाटकर, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आढावा बैठकीत प्रारंभी  पालक सचिव महेश पाठ‍क यांनी जिल्ह्यातील  सिंचन प्रकल्पातील पाणी साठा  व उपयुक्त  जलसाठा ,  माहे जून 2016 ते 31 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा,  टंचाई कृती आराखडे,  महसूल वसूली, पीक कर्ज वाटप , खरीप 2016 पीक कर्ज वाटप , रब्बी2016 पीक कर्ज वाटप, पीक कर्ज पुनर्गठन , खरीप पीक विमा भरणा,  खरीप हंगाम हवामान व पिक परिस्थिती अहवाल, सन 2016-17 मध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्या , बळीराजा चेतना अभियानांतर्गत वितरीत करण्यात आलेला निधी,  जिल्ह्यातील  निरीक्षण  विहरीतील पाणी पातळीचा तालुकानिहाय आढावा , ई-फेरफार , जिल्ह्यातील आधार नोंदणीबाबतची सद्य:स्थिती इत्यादी विषयांचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.
अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक
यांनी घेतली पूरवठा विभागाची विभागीय आढावा बैठक
प्रधान सचिव अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा  जिल्ह्याचे पालक सचिव  महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  जिल्ह्याची आढावा बैठक झाल्यानंतर पूरवठा विभागाची  e-POS या ऑनलाईन प्रणालीच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आढावा बैठक घेऊन  संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या़ सूचना दिल्या .
या बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील पुरवठा विभागाच्या उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,   औरंगाबादचे पूरवठा अधिकारी भारत कदम ,  जालन्याचे पुरवठा अधिकारी राजू नंदकर,  परभणीचे पूरवठा अधिकारी  श्री. बोधवड,  हिंगोलीचे पूरवठा अधिकारी ए.के. दुवाळकर, नांदेडचे पूरवठा अधिकारी एन.टी.  देवकुळे, बीडचे श्री. शिंगटे आणि लातूर जिल्ह्याचे पूरवठा अधिकारी प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते .

 बायोमॅट्रीक पध्दतीने  धानय्‍ वितरीत  करण्यासाठी e-POS मशिनचा  वापर करण्यात येणार आहे.  ही ऑनलाईन धान्य पूरवठा प्रणाली  मराठवाड्यात तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे – यामध्ये पहिल्या टप्प्यात  लातूर व नांदेड , दुसऱ्या टप्प्यात  जालना , हिंगोली व उस्मानाबाद या जिल्ह्यांचा तर तिसऱ्या टप्प्यात  परभणी , बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश  करण्यात आला आहे . 

त्या अनुषंगाने  पूर्वतयारी  म्हणून विभागातील सर्व जिल्ह्यात प्रत्येकी  दोन रास्तभाव दुकानदार यांना प्रायोगिक तत्वावर e-POS ही मशिन धान्य वितरणासाठी देण्यात  आली आहे . शिधापत्रिकेमध्ये  असणारा फरक 6 मार्च पर्यंत जूळवून घेणे ,  तांत्रिक अधिकाऱ्यांचे e-POS  मशिनचे प्रशिक्षण पूर्ण करणे,  e-POS  कार्यान्वित  करताना निदर्शनास  येणाऱ्या अडचणी दूर करणे ,  यामध्ये प्रत्यक्ष कार्यरत  रास्तभाव दुकानांची संख्या ,  एकूण शिधापत्रिकांची संख्या ,  शिधापत्रिकांवरील  सदस्य संख्या इत्यादींचा आढावा घेऊन योग्य  त्या सूचना या आढावा बैठकीत सर्व पूरवठा अधिकाऱ्यांना यावेळी पालक सचिव महोदयांनी दिल्या .. 

Friday, 3 March 2017

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा


उस्मानाबाद,दि.3:-अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रिककोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना  स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी शासनाने  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
            या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी/ 12 वी/ पदवी/ पदवीका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे अनुसूचित जाती व नवबौध्द प्रर्वगातील दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी  ही मर्यादा 50 टक्के आहे.
             या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर(इयत्ता 11वी,पदवी,पदव्यत्तुर पदवी)  शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी पुढीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
            मुंबई शहर,मुंबई उपनगर,नवी मुंबई,ठाणे,पुणे,निंपरीचिंचवड,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे भोजन भत्ता रूपये 32 हजार,निवास भत्ता रुपये 2 हजार, निर्वाह भत्ता रूपये 8 हजार, एकूण रूपये 60 हजार,इतर महसूल विभाग शहरातील व उर्वरित/ क/ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे  भोजन भत्ता रुपये 28 हजार, निवास भत्ता रुपये 15 हजार, निर्वाह भत्ता रुपये 8 हजार, एकूण रुपये 51 हजार,उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे  भोजन भत्ता 25 हजार रुपये,निवास भत्ता रुपये 12 हजार, निर्वाह भत्ता रुपये 6 हजार,असे एकूण रुपये 43 हजार,वरील रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात  येईल.

            या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना http://mahaeschol.maharashtra .gov.in/http://sjsa.maharashtra.gov.in /http://www.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या संकेतस्थळावरुन  डाउनलोड करुन घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातून काढलेले आहे, त्या जिल्हयाच्या  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष,टपालाद्वारे,कार्यालयाच्या ई-मेल वर दि.16 मार्च 2017 पर्यंत दाखल करावा. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा,असे सहाय्यक आयुक्त समाज  कल्याण  शिवाजी  शेळके  यांनी  कळविले  आहे.

निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या हयात प्रमाणपत्राबाबत


उस्मानाबाद.दि.3:-  जिल्हयातील कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन/ कुटुंब  निवृत्ती घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या माहे नोव्हेंबर मध्ये हयात प्रमाणपत्र घेण्यात येते.
या वर्षी  शासनातर्फे बायोमेट्रीक पध्दतीने तसेच बँकेतील यादीप्रमाणे हयात प्रमाणपत्र  घेण्यात आले आहे.  हयात प्रमाणपत्राची मुदत 15 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आली होती.  त्याप्रमाणे ज्या निवृत्ती वेतनधारकांनी बायोमेट्रीक पध्दतीने तसेच बँकेतील  यादयांना  सहया केल्या त्या निवृत्ती वेतनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना माहे फेब्रुवारी 2017 चे वेतन अदा करण्यात आलेले आहे.
ज्या निवृत्ती वेतनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना माहे फेब्रूवारी 2017 चे वेतन मिळाले नसेल त्यांनी बँकेचे पासबुक,आधार कार्ड, तसेच भ्रमणध्वनी घेऊन कोषागार कार्यालय, उस्मानाबाद येथे उपस्थित राहावे,जेणेकरून संबंधितांना निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतन अदा करणे सोईचे होईल,असे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार यांनी  कळविले  आहे. 

उस्मानाबाद येथे दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद दि.3:-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद आयोजित सुशिक्षीत बेरोजगारांसाठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 7 ते 18 मार्च  2017  या  कालावधीत  आयोजित  करण्यात  आला  आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायींच्या जाती, चाऱ्याचे नियोजन, लसीकरण, पॅकिंग, दूध विक्री तसेच शेळीपालन, उस्मानाबादी  शेळीचे महत्व, करडयांची  निगा, शेळीचे लसीकरण, शेळीचे आहार व आजारांविषयी  माहिती, अर्ध बंदिस्त  व  बंदिस्त  शेडची माहिती, शेळीच्या वेगवेगळया  जातीची  माहिती  व कुक्कुटपालनामध्ये  गावरान व बॉयलर याविषयी सविस्तर माहिती, त्याच्या खाद्याची व शेडची माहिती, विमा, आजाराविषयी माहिती, व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज तज्ञ डॉ. व्यक्तींचे  मार्गदर्शन  व  यशस्वी  उद्योजकांचे  मार्गदर्शन  करण्यात  येणार आहे.

            उद्योजकीय माहितीमध्ये संभाषण कौशल्य, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मागदर्शन, शासकीय कर्ज प्रस्तावाची सविस्तर माहिती, अहिल्याबाई होळकर महामंडळाची सविस्तर माहिती तसेच नाबार्ड विषयी माहिती दिली जाणार आहे. तरी इच्छूक युवक-युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी श्री.प्रकाश पवार, कार्यक्रम समन्वयक, मो.9604143488 यांच्याशी एम.सी.ई.डी., जिल्हा उद्योग केंद्र ,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी जिल्हा  उद्योग केंद्र श्री. पांडुरंग मोरे यांनी  केले  आहे.

कार्यक्रम समन्वयक पदाकरीता प्रशिक्षणाचे आयोजन


उस्मानाबाद,दि.3:-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उस्मानाबाद द्वारे आयेजित कार्यक्रम समन्वयक या पदाकरीता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयेजन जिल्हा उद्योग केद्र येथे करण्यात आले आहे.
          दि. 7 ते 11 मार्च 2017 या कालावधीमध्ये  घेण्यात  येणार  असून  यामध्ये  नावीन्यपूर्ण उपक्रम  घेतले  जाणार  आहेत. यामध्ये कार्यक्रम  आयोजकांच्या  कामाचे  महत्त्व  सिध्द  करण्यात येईल, व्यक्तीमत्तव  विकास, संवाद  कौशल्य, देहबोल, सुसूत्रता, सूत्रसंचलन, इव्हेन्ट  मॅनेजमेंट, व्सासपीठ  सजावट, कात्रणसेवा  डाक्यूमेंटेशन , व्यवसाय  मार्गदर्शन,  कार्यक्रमाचे  नियोजन, उद्योगाचे व्यवस्थापन,अकाउन्ट, आभार प्रदर्शन  इत्यादी विषयावर तज्ञ  व  अधिकारी  वर्गाकडून  मार्गदर्शन  करण्यात  येणार  आहे.

          या  प्रशिक्षणासाठी  शैक्षणिक  पात्रता  कोणत्याही  शाखेचा पदवीधर,एम. बी. ए. , एम. एस. डब्लू, वयोमर्यांदा 18  ते 35 वर्ष  असून, अधिक  माहिती  व  प्रवेश अर्जासाठी कार्यक्रमाचे  आयोजक  श्री.  प्रकाश  पवार मो. नं. 9604143488 यांच्याशी जिल्हा उद्योग  केंद्र, येथे  संपर्क साधावा, असे  आवाहन   प्रकल्प   अधिकारी  श्री. पांडुरंग  मोरे  यांनी  केले  आहे. 

माजी सैनिक/विधवा/युध्दविधवा यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक


उस्मानाबाद,दि.3:-जिल्हयातील सर्व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, माजी सैनिक/विधवा/युध्दविधवा/अवलंबित यांच्यासाठी दिनांक 7 मार्च  2017 रोजी  सकाळी 11.30 वाजता सैनिकांच्या कुटुंबियाना संरक्षणासाठी जिल्हा स्तरीय समितीची बैठक पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली  त्यांच्या  दालनात आयोजित  करण्यात आली आहे.
तरी  जिल्हयातील माजी सैनिक/विधवा/युध्दविधवा/अवलंबित त्यांच्या काही अडीअडचणी असल्यास आवश्यक त्‍या कागदपत्रासह लेखी स्वरुपात निवेदन जिल्हा सैनिक कार्यालय  येथे  दिनांक ६  मार्च  2016 रोजी  दुपारी 4.00 पर्यंत दोन  प्रतीत सादर करावीत, तसेच  बैठकीच्या  दिवशी  स्वत: उपस्थित रहावे.

 या बैठकीस सर्व माजी सैनिक  संघटनेच्या अध्यक्षानी  उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सु.मो. गोडबेाले, यांनी केले आहे.

Thursday, 2 March 2017

मराठी भाषा गैरवदिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन


          उस्मानाबाद,दि 2 :- वि.वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेबु्रवारी हा मराठी भाषा गैरवदिन  म्हणून  साजरा  करण्यात  येतो. यांचे औचित्य साधून  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, येथे  वि.वा. शिरवडकर  यांनी  लिहिलेल्या  तसेच नामवंत लेखकाच्या दर्जेदार ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.
          ग्रंथ  प्रदर्शनाचे  उदघाटन  उस्मानाबाद नगरपरिषद चे नगरध्यक्ष मकरंदराजे  निबांळकर  यांच्या शुभ हस्ते सरस्वतीच्या  प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने करण्यात आले, ग्रंथ प्रदर्शन वाचकासाठी खुली करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शन उदघाटन प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, एमएसईबी चे श्री रमेश पवार,ह. रा. डेंगळे, ही.भ. बिराजदार तसेच  अंकुर सोनटक्के, लोमटे सर, सुधीर सराव,  वाघमारे,सुभाष पाटोळे, श्रीधर पवार, अर्जून मुळे, गोपाळ अहंकारी  व  वाचक  बहुसंखेने  उपस्थित होते. 

रॅण्डम केबल सर्वेक्षण सोडत



उस्मानाबाद,दि.2:-जिल्हयातील बहुविध यंत्रणा परिचालक (मल्टीसिस्टीम ऑपरेटर MSO) आणि स्थानिक केबल परिचालक (लोकल केबल ऑपरेटर LCO) यांची विनाक्रम (रॅण्डम पध्दतीने) सर्वेक्षण करण्यासाठी सोडत काढावयाची आहे.त्या दृष्टीने औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हयातील एक मल्टीसिस्टीम ऑपरेटर आणि केबल परिचालक यांचे सर्वेक्षणाकरीता निवडीचे कामकाज दि.4 मार्च 2017 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे केले जाणार आहे. ही सोडत झाल्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या सोडतीस  मल्टीसिस्टीम ऑपरेटर व केबल परिचालक यांनी उपस्थित रहावे, असे अपर विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

डिजीधन जनजागृती कार्यक्रमाला उस्मानाबादमध्ये मोठा प्रतिसाद


उस्मानाबाद,दि.2:- कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी  महाराष्ट्र डिजिधन जनजागृती कार्यक्रमाला उस्मानाबादमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर, छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब यांनी दुसरा व रामकृष्ण परमहंस विद्यालय यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
कॅशलेस व्यवहाराविषयी सर्वात जास्त जनजागृती सत्रे आयोजित केल्याबद्दल रामकृष्ण परमहंस  महाविद्यालयास  विशेष  पारितोषिक  देण्यात येत आहे.स्पर्धेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांना डिजिटल व्यवहाराच्या पद्धतीविषयी  मार्गदर्शन, नागरिकांची  भीम अॅप/युपी आय वर नावनोंदणी करणे,दुकानदारांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सहाय्य करणे यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले होते.

कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हयातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत नागरिक,दुकानदार यांच्यात  जनजागृती  करण्यात आली. यामध्ये जिल्हयातील 476 डिजिीदूतामार्फत 4 हजार 22 नागरिकांना कॅशलेस व्यवहारासंबंधी जनजागृती करण्यात आली. 32 नवीन बँक खाते उघडण्यात आले. तर 25 वॉलेट रजिस्ट्रेशन,आठ दुकाने कॅशलेस, 54 युपीआय वर नाव नोंदणी करण्यात आले. 

उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन


उस्मानाबाद,दि.1:-दीनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद उस्मानाबाद आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हैद्राबाद, लातुर, उस्मानाबाद येथील खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांच्याकडील 604 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरुष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती नगरपरिषद सभागृह येथे शुक्रवार दि.3 मार्च 2017 रोजी  घेऊन निवड करण्यात येणार आहे.
उद्योजक पद, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पुढील प्रमाणे राहतील- सिक्युरिटी ॲन्ड सर्व्हिस इंडिया लि.हैद्राबाद अंतर्गत सिक्युरिटी गार्ड 300 पुरुष, किमान दहावी पास व नियमानुसार शारिरिक पात्रता अनिवार्य, 20 ते 37 वयोमर्यादा राहील, सबी लाईफ इन्शुरन्स  लि. उस्मानाबाद अंतर्गत एजन्सी मॅनेजर 30 पुरूष, किमान दहावी पास , 18 ते 50 वयोमर्यादा राहील, रितेश स्टिल इंडस्ट्रिज सांजा रोड,उस्मानाबाद ट्रेनर 03,डिप्लोमा/इंजिनिअरिंग मेकॅनिकल पदवी,वयोमर्यादा 18 ते 45,मशिन ऑपरेटर 02,आयटीआय मशिनिस्ट,वयोमर्यादा 18 ते40,  वेल्डर 03,आयटटीआय/एमईएस वेल्डर ट्रेड, वयोमर्यादा 18 ते 35,हेल्पर 03,वयोमर्यादा किमान 8 पास, वयोमर्यादा 18 ते30,सन अल्मुनिअम अफन्ड फॅब्रिकेशन प्लाग्लॉस अॅन्ड हार्डवेअर बार्शी नाका उस्मानाबाद,विंडा फिटर 04,पेंटर गॅनाईट कटर हेल्पर 05,सेल्समन 04,ग्लास कटर पॉलिसिंग,हेल्पर 03,ड्रायव्हर 01, इलेक्ट्रीकल 01,पात्रता 10 वी/12 वी पास, वयोमर्यादा 18 ते 30,प्रथम एज्शेन फाऊडेशन अंतर्गत किल्लारी ता.औसा,जि.लातूर,मेसन 50, बार बेंडींग 50, 5 वी किंवा आयआयटीआय मेसन,बार बेडींग 50,5 वी पास,वेल्डींग 50,पात्रता 10 वी किंवा आयटीआय वेल्डर,कारपेंटर50,पात्रता 7 वी  किंवा आयटीआय किंवा कारपेंटर,नर्सिग सहाय्यक 50,(मुलींसाठी) वयोमर्यादा 18 ते 30 राहील.
वेतन शैक्षणिक  योग्यतेनुसार, सुविधा, कॅन्टीन, निवास ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सुविधांबाबत संबंधित कंपनीच्या नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील,तसेच आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक/प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईझ  फोटो  आदी  सर्व  कागदपत्रांच्या  झेरॉक्स कॉपींसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद व  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री. रमेश पवार यांनी केले आहे.

संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक  (02472- 222236 ) मो. 7447740716 असा आहे.  या मेळाव्यात सहभाग नोंदविण्याकरिता उमेदवारांना या कार्यालयाकडील जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) असणे बंधनकारक आहे. एम्प्लॉयमेंट नोंदणी नसल्यास उमेदवार www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नवीन नाव नोंदणी करुन तात्काळ प्रमाणपत्र मिळवू शकतात. नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांनी जॉब फेअर (रोजगार मेळावा) सहभागासाठी पुढील कार्यवाही करावी > User Id > password > sign In > Job Fair > District > Action > Participation > Apply करून आपले एन्ट्री पास (प्रवेशपत्र) ऑनलाईन प्राप्त करुन घेऊन मेळाव्यास उपस्थित राहावे.

रेशीम कोष विक्रीसाठी बाजारपेठ सुरू करणार – सुभाष देशमुख


उस्‍मानाबाद दि.1:- जिल्हयातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी जिल्हयामध्ये कोष विक्री बाजार पेठ सुरू करण्याची घोषणा सहकार, पणन व वस्त्रेाद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे केली.
        रेशीम उत्पादक शेतकऱ्यासाठी  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शेतकरी कार्यशाळेचे उदघाटन मंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, रेशीम विकास अधिकारी एम.के. मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांने रेशीम शेती वाढविण्याच्या दृष्टीने आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यास प्रवृत्त करावे व प्रति ग्रामपंचायत मध्ये किमान 25 लाभार्थीनी मनरेगा अंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी करावी. जिल्हयात मोठया प्रमाणत रेशीम उद्योग करुन तुती लागवडीपासून ते कोष निर्मिती व कोष निर्मिती पासून ते पैठणी साडी तयार करण्यापर्यंतचा व्यवसाय सुरू करावा, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन श्री. देशमुख यांनी  दिले.
          जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, जिल्हयात रेशीम उद्योग अत्यंत प्रभावी पणे चालू असून जिल्हयात अजून मोठया प्रमाणात रेशीम उद्योग करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच मनरेगा मधून मोठया प्रमाणात रेशीम उद्योगाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हयात कोष खरेदी केंद्र चालू करण्याकरिता प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्यात येईल. तुती लागवड करण्याकरीता शेतकऱ्यांनी मनरेगा योजनेंतर्गत समूहामार्फत चालू वर्षामध्ये तुती लागवड करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
          प्रास्ताविक भाषणात सहाय्यक संचालक प्रादेशिक रेशीम  दिलीप हाके यांनी  रेशीम उद्योगाची जिल्हयातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील रेशीम उद्योग सदयस्थिती सांगितली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली .मनरेगा ही  योजना चालू वर्षी रेशीम उद्योगासाठी चालू करण्यात आली असून यामध्ये मिळणारे अनुदान हे एकूण मजूर व साहित्यासाठी रूपये 1 लाख्‍ 92 हजार 674 व शेडसाठी रूपये  89 हजार 946असे एकूण रक्कम 3 वर्षामध्ये त्याच्या बॅंक खात्यामध्ये महसूलमार्फत जमा करण्यात येते. याकरिता एका गावामधून  ग्रामसभेमधून कमीत कमी 25 लाभार्थ्यांची ठरावामधून निवड करण्यात येते. जिल्हयामध्ये एकूण 3 चॉकी केंद्र असून सर्व शेतकऱ्यांना 10 दिवसाचा बाल किटक पुरवठा केला जातो, असे त्यांनी सांगितले. या वर्षामध्ये आतापर्यंत एकूण 96 हजार अंदीपुंज पुरवठा केला असून 62 टन कोष उत्पादन घेवून कोष विक्रीपासून 2 कोटी 33 लाख रूपयाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

          रेशीम विकास अधिकारी श्री.एम.के.मुल्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. गजानन वडणे यांनी परिश्रम घेतले.

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा


उस्‍मानाबाद दि.1:- शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुप्रसिध्द नाटककार, कविवर्य श्री.वि.वा. शिरवाडकर यांचा दि.27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.

            यावेळी प्रा.श्री. आर.एच.देशमुख यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम  झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य प्रा.डॉ. एस.टी. बिडकर हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.व्ही.डी.बिराजदार यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार प्रा. एफ.एस. यमगर यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेतील विभागप्रमुख , अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा संपन्न


उस्‍मानाबाद दि.1: मराठी भाषा गौरवदिनानिमित्त  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या वतीने ‘उमेद’ स्‍पर्धा  परीक्षा  मार्गदर्शन  केंद्रामध्‍ये  निबंध  व  वक्‍तृत्‍व  स्‍पर्धा  घेण्‍यात आल्या.
             या स्पर्धेत   प्रथम  क्रमांक  भाग्‍यश्री  लोंढे, द्वितीय क्रमांक पल्‍लवी  शिंदे, तृतीय  क्रमांक स्‍वाती  शेरकर यांनी  मिळविला.यशस्वी  विद्यार्थ्‍यांना  जिल्हा  मंचाचे  अध्‍यक्ष  श्री माधव विठ्ठल कुलकर्णी, सदस्‍य श्री मुकूंद भगवान सस्ते व माजी सदस्य  श्री. देविदास वडगांवकर  यांच्या  हस्ते  पारितोषिकाचे  वितरण  करण्‍यात  आले.
 यावेळी मान्‍यवरांनी कवी  कुसुमाग्रज  मराठी  भाषा गौरव  दिनानिमित्त  उपस्थितांना मार्गदर्शन  केले.

 कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे श्री. य.श्री. मेकेवाड, प्रभारी प्रबंधक श्री सं. वि. कदम, लघुलेखक श्री. प्र.आ.नाईक, लघुलेखक निम्‍न श्रेणी श्री. अ. शा. जेवळीकर, शिरस्तेदार  तसेच  उमेद स्‍पर्धा परीक्षा केंद्राचे  निरंतर उपशिक्षणाधिकारी  श्री. शेख, विस्‍तार अधिकारी (शिक्षण)  श्री. घोलप, श्रीमती आशा नवले  व  इतर  कर्मचारी उपस्थित  होते.

सर्वांनी मिळून मातृभाषेचा सन्मान वाढवू या -मनोज शिवाजी सानप


उस्मानाबाद,दि.27:-आताच्या स्पर्धेच्या युगात कोणतीही स्पर्धा झाली तरी एकाची हार तर एकाची जीत होणारच आहे. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक नागरिकाने आपल्या मातृभाषेचा गोडवा जपावा,आपल्यासाठी मराठी भाषा आपली मातृभाषा असून आपण सर्वांनी मिळून आपल्या मातृभाषेचा सन्मान वाढवू या, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज  सानप  यांनी आज येथे केले.

जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद आणि येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै.सामनाचे तालुका  प्रतिनिधी  बाळासाहेब  जाधवर होते.

मराठी राजभाषा सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलताना मनोज सानप पुढे म्हणाले की, येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूल इंग्रजी माध्यमाची असली तरी या शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिन आपल्या शाळेत आयोजित करून मराठी भाषेचा प्रत्यक्ष कृतीतून सन्मानच केला आहे. आपली आई तशी आपली मातृभाषा होय, आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी मातृभाषेतूनच शिकता येतात म्हणूनच सर्वांनी मातृभाषेचा अभिमान बाळगावा,असेही ते पुढे म्हणाले.

शेवटी श्री. सानप यांनी यापूर्वी राज्यातील पहिली लोकराज्यशाळा हा बहुमान मिळालेली ही शाळा आता आयएसओ नामांकन प्राप्त झालेली उस्मानाबाद जिल्हयातील पहिली शाळा असून यापुढे या शाळेची उत्तरोत्तर अशीच  प्रगती  होवो, अशी  सदिच्छा  व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प  अर्पण  करून  दीपप्रज्ज्वलन  करण्यात आले.

यावेळी शाळेतील कु. नम्रता देशमुख,सिध्दी गवळी,कु.साक्षी सारंगे यांनी मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले तर याच शाळेतील  विद्यार्थीनींनी मराठी  भाषा  अभिमानपर गीत सादर केले.

यावेळी स्थानिक पत्रकारांचा त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुस्तके देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सा. तेरणाकाठचे  संपादक  दत्ता गायके  यांनी केले. यावेळी सर्जेराव पाटील,सौ.गोडसरे, श्री.मगर यांनीही  आपल्या भाषणातून मराठी भाषेची महती उपस्थिताना सांगितली. या कार्यक्रमास दै.गावकरीचे प्रतिनिधी अशोक‍ शिंदे, दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी दत्तात्रय बारकूल, दै.लोकमतचे सचिन बारकूल तसेच शाळेतील विद्यार्थी/ विद्यार्थीनी,नागरिक मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका सौ.संध्या ओव्हाळ यांनी केले तर शेवटी शाळेचे मुख्याध्यापक  सचिन  पाटील  यांनी  उपस्थित मान्यवरांचे आभार  मानले.

मराठवाड्याच्या प्रश्नावर राज्य शासन जास्त संवेदनशील : सुधीर मुनगंटीवार


            औरंगाबाद,दि. 1 : मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर राज्य शासन जास्त संवेदनशील आहे. मराठवाड्यात पुन्हा दुष्काळ येवू नये म्हणून मराठवाड्याचा वेगळा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात मोठ्या निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्याचे प्रश्न मार्ग लागण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
            येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित केलेल्या आठ जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी  संवाद साधतांना ते बोलत होते.           यावेळी वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते.
            राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन 6 मार्च 2017 पासून सुरु होत आहे. येत्या 18 मार्च 2017 रोजी राज्याचा अर्थ संकल्प विधानसभेत मांडण्यात येईल. त्यापूर्वी विभागीय पातळीवर बैठका घेवून त्या विभागातील जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखड्यावर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. या बैठकीत प्राधान्य क्रमांच्या विषयावर चर्चा करुन निधीच्या तरतूदीबाबत सांगोपांग चर्चा करण्यात  येत आहे. त्यांच अनुषंगाने आज मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासाठी बैठक घेण्यात आली.या बैठकीला  पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आणि त्या-त्या जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ही बैठक गेल्या जानेवारीमध्ये घेण्यात येणार होती. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने अशा बैठका घेण्यात मनाई केल्याने त्या बैठका  आता घेण्यात येत आहेत, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
            राज्यात कृषी, पर्यटन, शिक्षण, रस्ते, रोजगार, जलसंवर्धन, जलयुक्त शिवार या संबंधिच्या योजनांवर  विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याशिवाय कोणत्या जिल्ह्यात कुठली योजना   उत्तम प्रकारे राबविली जात आहे. ती योजना राज्यस्तरावर घेवून जाता येईल का ? या अनुषंगाने अशा योजनांची माहिती करुन घेत असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, गेल्या वर्षाच्या दुष्काळामुळे मराठवाड्याला मोठ्या संकटाला समोरे जावे लागले. त्यामुळे मराठवाडातील विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने वेगळा विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्यातील योजना राबविण्यासाठी निधी देण्यात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
            आजच्या आढावा बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत त्या-त्या जिल्ह्यातील योजनांसाठी  प्राधन्य क्रम ठरवून निधीची गरज ओळखून त्यासाठी तरतूद करण्याचा मानस आहे.त्यासाठी  पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मतं जाणून घेण्यात आली, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अशा बैठकामध्ये कामकाजाच्या अनुषंगाने आणि योजनातील बदलाबाबत आलेल्या सूचनांचा योग्य प्रकारे आदर केला जावून आवश्यक त्या योजनामध्ये बदलही केला जात आहे. अशा प्रकारे   गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत निधी न ठेवता त्यासाठी वेगळी तरतूद करावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्याप्रमाणे निर्यण घेण्यात आला आहे. याशिवाय आमदार निधीतील कामाबाबत नवीन धोरण आणण्याच्या सूचना करण्यात आली होती. त्या सूचनेप्रमाणे नवीन धोरण आणण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी दिली.
            मराठवाड्यासह राज्यातील रस्त्यांची कामे करण्याची मागणी लोकप्रतिनिधीकडून होत आहे. याबाबत नवीन धोरण स्वीकारुन राज्यातील रस्त्यांची कामे अधिक जलदगतीने आणि गुणवत्तेची करण्यात येणार आहेत. राज्यात वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात येत आहे. 50 कोटी वृक्ष लागवडीचा निरधार करण्यात आला आहे. यासाठी विविध जिल्ह्यातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. काही जिल्ह्यात वन क्षेत्राशिवाय इतर ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.याबाबत लातूर आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे, असे सांगून श्री. मनुगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील शेती सुधारावयाची असेल तर राज्यातील सिचंनाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. यादृष्टीने या क्षेत्रात राज्य सरकार संवेदनशीलपणे काम करत आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने सिचंन क्षेत्रासाठी 7 हजार 272 कोटी रुपये राखून ठेवले आहे. ज्या प्रकल्पाची 10 ते 20 टक्के कामे पूर्ण केल्यास ते प्रकल्प पूर्णत्वास जातील यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचे बॉन्ड विक्रीस काढण्यात येत आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात  आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            राज्यातील 100 पैकी  99 टक्के प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दयावी लागणे ही चांगली बाब नाही. गेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या 100 पैकी 99 टक्के प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागत आहे.  प्रमुख्याने प्रथम प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ठरलेल्या निधीतच प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढत नाही. परंतु यापूर्वी बहुतेक प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च होवूनही प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. ते प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने खरेदीवर नियत्रंण आणले आहे. आता आम्ही खरेदी न करता काही योजनांमध्ये लाभार्थिच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करत आहोत. पूर्वी लाभार्थ्यांसाठी वस्तू खरेदी करुन त्या गोदामात ठेवल्या जायच्या त्यात त्या वस्तू खराब होत असत आणि  त्या लाभार्थ्यांना त्या वस्तुंचा लाभही घेता येत नसे हे आता आम्ही बंद केले आहे. त्यामुळे पैश्यांचा अपव्यय थांबला आहे. त्यामुळे राज्याची अर्थ व्यवस्था चिंतेच्या मार्गवरुन योग्य मार्गावर मार्गक्रमन करीत आहे. राज्याच्या अर्थ व्यवस्थेला गती देण्यासाठी पर्यटन, कृषी, सिचंन, रोजगार आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीस गती देण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे राज्याचा विकासदर 5.5 टक्यांवरुन आठ टक्यांवर पोहचला आहे. अगामी काळात हा विकास दर युरोप, अमेरिकेपेक्षा जास्त करण्यावर भर असणार आहे, अशी माहितीही त्यांनी  यावेळी दिली.
            मराठवाड्याचा पाणी प्रश्न्सोडविण्यासाठी गुजरातच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा वॉटर ग्रिड तयार करण्यात येत आहे. त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सोबत गुजरातच्या वॉटर ग्रिड प्रकल्पांची पाहणीही केली आहे. या वॉटर ग्रिडमुळे मराठवाड्यातील कृषी, उद्योग आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. ही काम 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामांच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेला 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील तूर खरेदीचा निर्यण राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी  चिंता करुन नये. राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी 26 हजार 186 कोटी रुपयांची तरतूद गेल्या वर्षीच्या अर्थ संकल्पात केली आहे. यापुर्वीच्या सरकारने अल्प निधीची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली होती. आम्ही वेगाने प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी होत आहे.पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याशिवाय यात यश नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्यासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा भाग आहे. त्यादृष्टीने आम्ही  काम करीत आहोत. त्यासाठी शेतकऱ्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना यासह अनेक योजना राबविल्या जात आहेत. युरीया खताच्या किमंती पुढील चार वर्ष स्थिर ठेवण्यासाठी नियमन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

            आज दुपारी 2.30 वाजेनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मराठवाड्यातील आठ जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखडयावर सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकांना त्या-त्या जिल्ह्याचे   पालकमंत्री उपस्थित हेाते. त्यात जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर, नांदेडचे अर्जुन खोतकर, परभणीचे गुलाबराव पाटील, हिंगोलीचे दिलीप कांबळे उपस्थित होते. याशिवाय या बैठकांना त्या-त्या जिल्ह्यातील खासदार, आमदारही उपस्थित होते. या बैठकीस वित्त विभागचे उपसचिव सतीश मोघे, विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन विभागाचे उपयुक्त विजय आहेर उपस्थित होते