Friday, 4 January 2019

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा झाला मुख्यमंत्र्यांशी दिलखुलास थेट संवाद

*घर मिळालं अन् जीवनात स्थिरता आली"-लाभार्थ्यांनी दिल्या प्रतिक्रिया*


उस्मानाबाद,दि. 2:   प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी ),पं. दीनदयाळ उपाध्याय योजना, रमाई आवास योजना, दादासाहेब गायकवाड सबळीकरण याेजना, शबरी आदिवासी आवास योजना यासारख्या घरकुल योजनांमधून जागा खरेदीसाठी तसेच घर बांधण्यासाठी पैसे मिळाले. उज्वला योजनेतून स्वयंपाकाचा गॅस मिळाला अन् स्वच्छतागृहासाठीही अनुदान मिळाले, त्यामुळे घर मिळालं अन् जीवनात स्थिरता आली,अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया राज्यातल्या विविध भागातल्या लाभार्थ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी  संवाद साधताना दिल्या.
    आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.राज्यभरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राच्या व्हिडीओ कॉन्फरन्स रुम मधून अनेक लाभार्थ्यांनी या लोकसंवाद उपक्रमात उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण, शहरी ), रमाई आवास योजना , शबरी आदिवासी आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील लाभार्थी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार,राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे श्री.कोंडेकर, श्री.रुक्मे उपस्थित होते.
     राज्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १२ लाख घरांचे २०१९ च्या अखेर पर्यंत नियोजन असून आतापर्यंत जवळपास ६ लाख घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरित ६ लाख घरे या वर्षात पूर्ण होतील. घरकुल योजनेतील घरे बांधताना मुख्यतः वाळूची समस्या भेडसावत होती. मात्र आता शासन घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न घेता देणार अाहे,त्यामुळे हा प्रश्न सुटेल तसेच घराच्या आराखड्याला मंजूर करून घेण्यासाठी जो खर्च येतो तोदेखील येऊ नये याकरिताही शासनाचा पाठपुरावा सुरू आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
0000