उस्मानाबाद,दि.2:- कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन
देण्यासाठी महाराष्ट्र डिजिधन जनजागृती कार्यक्रमाला उस्मानाबादमध्ये मोठा
प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या
स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला
तर, छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब यांनी दुसरा व रामकृष्ण परमहंस विद्यालय
यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
कॅशलेस व्यवहाराविषयी सर्वात जास्त जनजागृती सत्रे आयोजित
केल्याबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास
विशेष पारितोषिक देण्यात येत आहे.स्पर्धेत सहभागी झालेल्या
महाविद्यालयांना डिजिटल व्यवहाराच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन, नागरिकांची भीम अॅप/युपी आय वर नावनोंदणी करणे,दुकानदारांना
कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सहाय्य करणे यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले होते.
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हयातील
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत नागरिक,दुकानदार यांच्यात जनजागृती
करण्यात आली. यामध्ये जिल्हयातील 476 डिजिीदूतामार्फत 4 हजार 22 नागरिकांना
कॅशलेस व्यवहारासंबंधी जनजागृती करण्यात आली. 32 नवीन बँक खाते उघडण्यात आले. तर
25 वॉलेट रजिस्ट्रेशन,आठ दुकाने कॅशलेस, 54 युपीआय वर नाव नोंदणी करण्यात आले.
