उस्मानाबाद दि.1:-
जिल्हयातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन
ती दूर करण्यासाठी जिल्हयामध्ये कोष विक्री बाजार पेठ सुरू करण्याची घोषणा सहकार,
पणन व वस्त्रेाद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे केली.
रेशीम
उत्पादक शेतकऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या
यशवंतराव चव्हाण सभागृहात शेतकरी कार्यशाळेचे उदघाटन मंत्री देशमुख यांच्या हस्ते
करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, रेशीम विकास अधिकारी एम.के. मुल्ला
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांने रेशीम शेती वाढविण्याच्या दृष्टीने
आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यास प्रवृत्त करावे व प्रति
ग्रामपंचायत मध्ये किमान 25 लाभार्थीनी मनरेगा अंतर्गत रेशीम शेती करण्यासाठी
जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी करावी. जिल्हयात मोठया प्रमाणत रेशीम उद्योग
करुन तुती लागवडीपासून ते कोष निर्मिती व कोष निर्मिती पासून ते पैठणी साडी तयार
करण्यापर्यंतचा व्यवसाय सुरू करावा, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे
आश्वासन श्री. देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, जिल्हयात रेशीम उद्योग अत्यंत प्रभावी पणे चालू
असून जिल्हयात अजून मोठया प्रमाणात रेशीम उद्योग करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत
तसेच मनरेगा मधून मोठया प्रमाणात रेशीम उद्योगाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात
येईल. जिल्हयात कोष खरेदी केंद्र चालू करण्याकरिता प्रस्ताव तयार करून शासनास
पाठविण्यात येईल. तुती लागवड करण्याकरीता शेतकऱ्यांनी मनरेगा योजनेंतर्गत
समूहामार्फत चालू वर्षामध्ये तुती लागवड करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात सहाय्यक संचालक प्रादेशिक रेशीम दिलीप हाके यांनी रेशीम उद्योगाची जिल्हयातील तसेच संपूर्ण
महाराष्ट्रातील रेशीम उद्योग सदयस्थिती सांगितली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी
रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली .मनरेगा ही योजना चालू वर्षी रेशीम उद्योगासाठी चालू
करण्यात आली असून यामध्ये मिळणारे अनुदान हे एकूण मजूर व साहित्यासाठी रूपये 1
लाख् 92 हजार 674 व शेडसाठी रूपये 89
हजार 946असे एकूण रक्कम 3 वर्षामध्ये त्याच्या बॅंक खात्यामध्ये महसूलमार्फत जमा
करण्यात येते. याकरिता एका गावामधून
ग्रामसभेमधून कमीत कमी 25 लाभार्थ्यांची ठरावामधून निवड करण्यात येते.
जिल्हयामध्ये एकूण 3 चॉकी केंद्र असून सर्व शेतकऱ्यांना 10 दिवसाचा बाल किटक
पुरवठा केला जातो, असे त्यांनी सांगितले. या वर्षामध्ये आतापर्यंत एकूण 96 हजार अंदीपुंज
पुरवठा केला असून 62 टन कोष उत्पादन घेवून कोष विक्रीपासून 2 कोटी 33 लाख रूपयाचे
उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.
रेशीम विकास अधिकारी श्री.एम.के.मुल्ला यांनी उपस्थितांचे
आभार मानले. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. गजानन
वडणे यांनी परिश्रम घेतले.