Thursday, 24 September 2026

*मतदार नोंदणीपासून स्वावलंबनापर्यंत तृतीयपंथीयांना सेवा संकल्पचा आधार* ‘आपले सरकार सेवा केंद्रातून आकाश काकडे यांना उपजीविकेचा आधार

*मतदार नोंदणीपासून स्वावलंबनापर्यंत तृतीयपंथीयांना सेवा संकल्पचा आधार* ‘आपले सरकार सेवा केंद्रातून आकाश काकडे यांना उपजीविकेचा आधार धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) लोकशाही प्रक्रियेत तृतीयपंथीयांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या अडचणी आणि समस्या थेट जाणून घेण्याचा प्रयत्न ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत करण्यात आला. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरात नवीन मतदार नोंदणी आणि एसआयआरबाबत मार्गदर्शन करण्यात आले.याच अभियानातून तृतीयपंथीय व्यक्ती आकाश प्रकाश काकडे यांना आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून उपजीविकेचे साधन मिळाल्याची बाबही समोर आली. देशाचे पंतप्रधान यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांनी आपल्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे.त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत मतदार नोंदणीसाठी २२ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त उमेश सोनवणे,लातूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.यावेळी श्रीमती पानसे, अशासकीय सदस्य,जिल्हास्तरीय समिती,धाराशिव,निवडणूक विभागाचे कर्मचारी,तृतीयपंथीय व्यक्ती आकाश प्रकाश काकडे तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले. शिबिरात प्रादेशिक उपायुक्त उमेश सोनवणे यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.त्यामुळे हे शिबिर केवळ मतदार नोंदणीपुरते मर्यादित न राहता तृतीयपंथीयांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठीही व्यासपीठ ठरले.निवडणूक विभाग,धाराशिव येथील कर्मचाऱ्यांनी उपस्थित तृतीयपंथीयांना नवीन मतदार नोंदणी तसेच एसआयआर (SIR) संबंधित माहिती दिली.त्याचबरोबर मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या इतर बाबींची पूर्तताही करून घेण्यात आली. ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत तृतीयपंथीय व्यक्ती आकाश प्रकाश काकडे यांच्या ‘आपले सरकार सेवा केंद्राच्या नूतनीकरणास प्रादेशिक उपायुक्त उमेश सोनवणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध योजनांची व सेवांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान आकाश प्रकाश काकडे यांनी आपला अनुभव अधिकाऱ्यांसमोर मांडला.‘आपले सरकार सेवा केंद्रामुळे आपल्याला उपजीविकेचे साधन मिळाले आहे,’ असे त्यांनी सांगितले.तृतीयपंथीय व्यक्तींना शासकीय योजनांच्या प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे सेवा केंद्र त्यांच्यासाठी आधार ठरले आहे. मतदार म्हणून लोकशाही प्रक्रियेत सहभागाची संधी आणि रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल,अशा दोन्ही पातळ्यांवर तृतीयपंथीयांना शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत करण्यात आला. *************

गटई स्टॉलने दिले व्यवसायाला बळ *‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांची लाभार्थ्याच्या व्यवसायस्थळी भेट*

गटई स्टॉलने दिले व्यवसायाला बळ *‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांची लाभार्थ्याच्या व्यवसायस्थळी भेट* धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) रस्त्याच्या कडेला व्यवसाय करताना ऊन,वारा आणि पावसाचा सामना करावा लागत होता.आता समाजकल्याण विभागाच्या गटई स्टॉल योजनेतून हक्काचे सुरक्षित व्यावसायिक ठिकाण मिळाल्याने व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले असून उत्पन्नातही वाढ झाली आहे. धाराशिव येथील गणेशनगरमधील लाभार्थी प्रदीप काशीनाथ कांबळे यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना या योजनेमुळे आपल्या व्यवसायात झालेला सकारात्मक बदल सांगितला. देशाचे पंतप्रधान यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांनी आपल्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचला,त्यातून त्यांच्या जीवनात आणि व्यवसायात काय बदल झाला,याची माहिती जाणून घेण्यावरही भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या गटई स्टॉल योजनेतील सन २०२४-२५ मधील मंजूर लाभार्थी प्रदीप काशीनाथ कांबळे,गणेशनगर,ता. धाराशिव यांनी स्थापित केलेल्या गटई स्टॉलला २२ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी उमेश सोनवणे,प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग, लातूर आणि सचिन कवले, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव यांनी कांबळे यांच्या गटई स्टॉलची पाहणी केली.त्यांनी लाभार्थ्याशी प्रत्यक्ष संवाद साधून योजनेतून मिळालेल्या लाभाची तसेच व्यवसायातील बदलाची माहिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना कांबळे यांनी या योजनेअंतर्गत आपल्याला गटई स्टॉल आणि त्यासोबत सहाय्यक अनुदान मिळाल्याचे सांगितले.या मदतीमुळे व्यवसायासाठी आवश्यक असलेली सुविधा उपलब्ध झाल्याने काम करणे अधिक सोयीचे झाल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेषतः गटई स्टॉलमध्ये व्यवसाय करताना आता ऊन,वारा आणि पावसापासून संरक्षण मिळत असल्याने पूर्वीच्या तुलनेत व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. योजनेतून मिळालेल्या गटई स्टॉलमुळे व्यवसायाला स्थैर्य मिळाले असून व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली आहे,अशी माहिती लाभार्थी प्रदीप कांबळे यांनी यावेळी दिली. ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत झालेल्या या भेटीत शासनाच्या योजनेतून मिळालेली मदत लाभार्थ्याच्या प्रत्यक्ष व्यवसायासाठी कशी उपयोगी ठरत आहे आणि त्यातून त्याच्या उत्पन्नवाढीस कसा हातभार लागत आहे,हे लाभार्थ्याने झालेल्या संवादातून सांगितले. ***************

*ई-केवायसी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा : जिल्ह्यात २ लाख ४२ हजार ६२ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित*

*ई-केवायसी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा : जिल्ह्यात २ लाख ४२ हजार ६२ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित* धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रिकाधारकांची अचूक ओळख पटविण्यासह पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचविण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११ लाख ४९ हजार ३०१ लाभार्थ्यांपैकी ९ लाख ७ हजार २३९ लाभार्थ्यांची, म्हणजेच ७८.९४ टक्के ई-केवायसी पूर्ण झाली असून,अद्याप २ लाख ४२ हजार ६२ लाभार्थ्यांची (२१.०६ टक्के) ई-केवायसी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी,अन्यथा भविष्यात मिळणारे रेशनचे धान्य बंद होऊ शकते,असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी,धाराशिव यांनी दिला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची अचूक ओळख पटविण्यासाठी आणि धान्याच्या वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ती तातडीने पूर्ण करावी. जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थितीनुसार धाराशिव तालुक्यात २ लाख ७३ हजार ४०१ लाभार्थ्यांपैकी २ लाख १७ हजार ९२७ लाभार्थ्यांची (७९.७१ टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून, ५५ हजार ४७४ लाभार्थ्यांची (२०.२९ टक्के) ई-केवायसी प्रलंबित आहे. तुळजापूर तालुक्यात १ लाख ६६ हजार ७८९ लाभार्थ्यांपैकी १ लाख ३२ हजार ८४ लाभार्थ्यांची (७९.१९ टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून,३४ हजार ७०५ लाभार्थ्यांची (२०.८१ टक्के) प्रक्रिया प्रलंबित आहे. लोहारा तालुक्यात ८८ हजार २६० लाभार्थ्यांपैकी ७० हजार ९४९ लाभार्थ्यांची (८०.३९ टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून,१७ हजार ३११ लाभार्थ्यांची (१९.६१ टक्के) ई-केवायसी प्रलंबित आहे. उमरगा तालुक्यात १ लाख ८३ हजार २६ लाभार्थ्यांपैकी १ लाख ३९ हजार ७७२ लाभार्थ्यांची (७६.३७ टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून, ४३ हजार २५४ लाभार्थ्यांची (२३.६३ टक्के) प्रक्रिया प्रलंबित आहे. भूम तालुक्यात १ लाख ४२९ लाभार्थ्यांपैकी ७९ हजार ६४० लाभार्थ्यांची (७९.३० टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून, २० हजार ७८९ लाभार्थ्यांची (२०.७० टक्के) ई-केवायसी प्रलंबित आहे. परंडा तालुक्यात १ लाख १७ हजार ४१४ लाभार्थ्यांपैकी ८९ हजार ८४५ लाभार्थ्यांची (७६.५२ टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून,२७ हजार ५६९ लाभार्थ्यांची (२३.४८ टक्के) प्रक्रिया प्रलंबित आहे. वाशी तालुक्यात ६६ हजार १४१ लाभार्थ्यांपैकी ५३ हजार ४२० लाभार्थ्यांची (८०.७७ टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून, १२ हजार ७२१ लाभार्थ्यांची (१९.२३ टक्के) प्रक्रिया प्रलंबित आहे. कळंब तालुक्यात १ लाख ५३ हजार ८४१ लाभार्थ्यांपैकी १ लाख २३ हजार ६०२ लाभार्थ्यांची (८०.३४ टक्के) ई-केवायसी पूर्ण झाली असून,३० हजार २३९ लाभार्थ्यांची (१९.६६ टक्के) ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ११ लाख ४९ हजार ३०१ लाभार्थ्यांपैकी ९ लाख ७ हजार २३९ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे.तर २ लाख ४२ हजार ६२ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे. ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे,त्यांची यादी संबंधित गावातील रास्त भाव धान्य दुकानदारांकडे (रेशन दुकानदार) उपलब्ध करून देण्यात आली आहे.संबंधित नागरिकांनी आधार कार्डसह त्वरित आपल्या रेशन दुकानदाराशी संपर्क साधून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. लाभार्थ्यांना केवळ आपल्या गावातील रेशन दुकानातच ही प्रक्रिया करण्याचे बंधन नाही. गावातील किंवा इतर कोणत्याही रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा (बायोमेट्रिक) देऊन ई-केवायसी पूर्ण करता येईल. रेशन दुकानात जाण्याबरोबरच मोबाईल अॅपद्वारेही नागरिकांना घरबसल्या ई-केवायसी करता येणार आहे.त्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून ‘MERA-KYC’ किंवा ‘Face eKYC’ अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसीसाठी आता मर्यादित कालावधी शिल्लक असल्याने प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी प्राधान्याने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभाग यांनी केले आहे. *************

*गॅस ग्राहकांनी ई-केवायसी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा* अन्यथा एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी होणार बंद

*गॅस ग्राहकांनी ई-केवायसी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा* अन्यथा एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी होणार बंद धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) एलपीजी गॅस ग्राहकांनी आपल्या ग्राहक नोंदी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी (Electronic Know Your Customer) प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करावी. ई-केवायसी पूर्ण न केल्यास एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी बंद होऊ शकते.त्यामुळे ज्या ग्राहकांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही,त्यांनी विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.शेंडे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच संबंधित तेल विपणन कंपन्यांच्या निर्देशानुसार एलपीजी गॅस ग्राहकांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.एलपीजी ग्राहकांनी ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.केंद्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (Biometric Authentication – e-KYC) अनिवार्य आहे. ज्या एलपीजी गॅस ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही,अशा ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहक संबंधित एलपीजी वितरकाकडे प्रत्यक्ष जाऊन आवश्यक पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. तसेच संबंधित अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन ई-केवायसी करता येईल.याशिवाय तेल विपणन कंपन्यांच्या अधिकृत मोबाईल अॅपद्वारे Face-based Aadhaar Authentication च्या माध्यमातूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. इंडेन (Indane) ग्राहकांसाठी Indian Oil ONE,भारतगॅस (Bharatgas) ग्राहकांसाठी HelloBPCL,तर एचपी गॅस (HP Gas) ग्राहकांसाठी HP PAY या संबंधित तेल विपणन कंपन्यांच्या अधिकृत मोबाईल अॅपचा वापर करता येईल. ई-केवायसी करताना ग्राहकांनी एलपीजी ग्राहक क्रमांक किंवा ग्राहक पुस्तिका उपलब्ध असल्यास ती सोबत ठेवावी. आधार क्रमांक आणि आवश्यक ओळख तपशीलही उपलब्ध ठेवावेत.ई-केवायसीसाठी संबंधित एलपीजी वितरक किंवा अधिकृत माध्यमाचाच वापर करावा. विशेषतः सायबर फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे. ग्राहकांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्ती,संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपला आधार क्रमांक,ओटीपी अथवा बँक खात्याची माहिती देऊ नये.ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची नोंद,पावती किंवा उपलब्ध असल्यास डिजिटल पुष्टी जतन करून ठेवावी. सर्व संबंधित एलपीजी गॅस ग्राहकांनी या बाबीची तातडीने दखल घेऊन ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे. ***************

ज्येष्ठांच्या आरोग्यापासून डिजिटल साक्षरतेपर्यंत मार्गदर्शन *जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ; सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरासह कायदेशीर सल्लाही*

ज्येष्ठांच्या आरोग्यापासून डिजिटल साक्षरतेपर्यंत मार्गदर्शन *जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ; सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिरासह कायदेशीर सल्लाही* धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे आणि त्यांना आवश्यक मदत व मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धाराशिव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, धाराशिव येथे हा कार्यक्रम होणार आहे. भारताच्या संविधानातील राज्य धोरणाच्या निदेशक तत्त्वांमधील अनुच्छेद ३९ (क) व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावेत, या अनुषंगाने तरतूद करण्यात आली आहे.समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे स्थान विचारात घेऊन त्यांना वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावा,समाजातील त्यांचे जीवन सुसह्य व्हावे तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे,यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण निर्गमित करण्यात आले आहे. वृद्धापकाळामध्ये आर्थिक क्षमता, कामाचा हक्क,शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्याच्या दृष्टीनेही या धोरणात महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या धोरणानुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य, हक्क आणि सन्मानाबाबत जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच अभियानाचा भाग म्हणून १ ऑक्टोबरच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, आरोग्य शिबिर तसेच डिजिटल साक्षरतेविषयी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्था आणि व्यक्तींचा सत्कार व गौरवही यावेळी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिन कवले, सहाय्यक आयुक्त,धाराशिव यांनी केले आहे. *****************

*महाडीबीटीवरील १,७३८ प्रलंबित अर्ज २८ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा* एकही पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये

*महाडीबीटीवरील १,७३८ प्रलंबित अर्ज २८ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा* एकही पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेत मिळावा आणि एकही पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये,यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले सर्व अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ ते २०२५-२६ या कालावधीतील १ हजार ७३८ अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे.हे सर्व अर्ज २८ सप्टेंबर २०२६ अखेर महाडीबीटी १.० पोर्टलद्वारे पूर्णतः निकाली काढावेत,असे आवाहन सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव यांनी केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत VJNT,OBC व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता आदी योजना राबविण्यात येतात.या योजनांमधील सन २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील VJNT, OBC व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. हे अर्ज निकाली काढण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय करण्यात आले आहे. सन २०१८-१९ ते २०२५-२६ या कालावधीसाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरले आहेत.मात्र,यातील अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित आहेत.संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अद्याप या अर्जांची पडताळणी करून ते सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सन २०१८-१९ ते २०२५-२६ या कालावधीतील आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या VJNT, OBC व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीचे पात्र अर्ज मंजुरीसाठी तात्काळ सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत. अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला (T.C.) आणि गुणपत्रक हे मूळ प्रतीत (Original) असल्याची दक्षता घ्यावी.ज्या अर्जांमध्ये त्रुटी असतील,त्या अर्जांतील त्रुटींची पूर्तता करूनच अर्ज मंजुरीसाठी कार्यालयाकडे सादर करावेत. तसेच संबंधित महाविद्यालयाच्या लॉगिनवर एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही,याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही महाविद्यालयांना प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते.तथापि, सद्यःस्थितीत धाराशिव जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर आर्थिक वर्ष २०१८-१९ ते २०२५-२६ या कालावधीतील १ हजार ७३८ अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले सर्व अर्ज २८ सप्टेंबर २०२६ अखेर महाडीबीटी १.० पोर्टलद्वारे पूर्णतः निकाली काढणे आवश्यक आहे.प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या लॉगिनवर एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही,याची दक्षता घ्यावी. तसेच सन २०१८-१९ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षांतील महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी नोंदणीकृत झालेला विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील,असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करून विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन अमोल ताकभाते, सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव यांनी केले आहे. ************

‘सेवा संकल्प अभियानात’ जात वैधतेसाठी विशेष मोहीम *अकरावी-बारावी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी; प्रलंबित प्रकरणांच्या त्रुटीपूर्तीसाठी विशेष दिवस*

‘सेवा संकल्प अभियानात’ जात वैधतेसाठी विशेष मोहीम *अकरावी-बारावी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी; प्रलंबित प्रकरणांच्या त्रुटीपूर्तीसाठी विशेष दिवस* धाराशिव दि.२४ सप्टेंबर (जिमाका) शैक्षणिक प्रवेशाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सन २०२६-२७ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,धाराशिव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन २०२६-२७ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित असलेल्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अद्याप जात पडताळणी समितीकडे ऑनलाइन भरलेले अर्ज जमा केलेले नाहीत,अशा विद्यार्थ्यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आपला अर्ज ऑनलाइन भरून समितीकडे जमा करावा. तसेच,राखीव प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नांदेड समितीकडे अर्ज दाखल केले आहेत,मात्र त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत,अशा सर्व प्रकरणांमध्ये समितीकडून संबंधितांना त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत.अशा अर्जदारांनी व त्यांच्या पालकांनी त्रुटींच्या पूर्ततेसाठी आवश्यक मूळ कागदपत्रे ऑनलाइन करून दि. २८, २९ व ३० सप्टेंबर २०२६ तसेच दि.५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी. त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर अशा प्रकरणांची समितीकडून नियमानुसार प्राधान्याने व त्वरित तपासणीची कार्यवाही करण्यात येईल.त्यानंतर संबंधित पात्र अर्जदारांना शिबिरादरम्यान जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन निर्गमित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ ही महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. **************

पेन्शन व ‘स्पर्श’च्या अडचणी सोडविण्यासाठी बेळगावात मेळावा *माजी सैनिक,वीरनारी, वीरमाता-वीरपिता व वयोवृद्ध सैनिकांसाठी ४ ऑक्टोबरला आयोजन*

पेन्शन व ‘स्पर्श’च्या अडचणी सोडविण्यासाठी बेळगावात मेळावा *माजी सैनिक,वीरनारी, वीरमाता-वीरपिता व वयोवृद्ध सैनिकांसाठी ४ ऑक्टोबरला आयोजन* धाराशिव दि.२४ सप्टेंबर(जिमाका) जिल्ह्यातील माजी सैनिक,वीरनारी, वीरमाता,वीरपिता तसेच सर्व वयोवृद्ध सैनिकांच्या पेन्शन व ‘स्पर्श’ प्रणालीसंदर्भातील शंका आणि अडचणींचे निरसन करण्यासाठी रविवार,४ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगाव येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगावच्या शिवाजी स्टेडियमवर सकाळी ७ वाजल्यापासून हा मेळावा होणार आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन तसेच ‘स्पर्श’ प्रणालीच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मेळाव्यात पेन्शन व ‘स्पर्श’संबंधी असलेल्या शंका व अडचणींचे निरसन करण्याबरोबरच माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या अन्य शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे.संबंधित योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शनदेखील यावेळी करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी,माजी सैनिक, वीरनारी,वीरमाता,वीरपिता तसेच सर्व वयोवृद्ध सैनिकांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर,बेळगाव यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत केले आहे. मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर,बेळगाव यांच्या ८३१७३५०५८४ या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. *******************

Wednesday, 23 September 2026

*दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाही * पिकांचे मोठे नुकसान * पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य * सरसकट मदत,पीक विमा, चारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना *करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी*

*दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाही * पिकांचे मोठे नुकसान * पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य * सरसकट मदत,पीक विमा, चारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना *करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी* धाराशिव,दि. २३ सप्टेंबर (जिमाका) पावसाच्या दीर्घ खंडाने हिरव्यागार शिवाराची जागा करपलेल्या पिकांनी घेतली आहे. हंगामासाठी केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया जात असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर भविष्याची चिंता आहे.अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २३) तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.कोरडा पडलेला साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे,अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांतील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.पेरणीनंतर सुरुवातीला आशादायक स्थिती असताना ऐन वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारली.बियाणे,खते, औषधे आणि मशागतीवर केलेला खर्च व मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी करजखेडा साठवण तलावाची पाहणी केली. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता अधोरेखित केली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी बळी भोसले यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त ऊस आणि सोयाबीन पिकांची बारकाईने पाहणी केली. पेरणी कधी केली,पिकाला किती पाऊस मिळाला,पावसाचा खंड किती काळ राहिला आणि त्याचा पिकाच्या वाढीवर व संभाव्य उत्पादनावर काय परिणाम झाला, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून उसाची वाढही खुंटल्याचे त्यांनी नमूद केले.पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदत केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री थेट बांधावर आल्याने परिसरातील शेतकरीही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे आले. पावसाच्या खंडामुळे झालेले नुकसान,उत्पादनातील संभाव्य घट,हंगामासाठी केलेली गुंतवणूक आणि त्याचा कुटुंबाच्या अर्थकारणावर होणारा परिणाम त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या.मुलांचे शिक्षण बंद पडणार नाही आणि अडचणीच्या काळात शेतकरी कुटुंबांना आवश्यक आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील,अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.सध्याच्या परिस्थितीत पिके वाचविणे कठीण झाले आहे.त्यामुळे उपलब्ध पाणी सर्वप्रथम पिण्यासाठी राखून ठेवावे लागेल.पिण्याच्या पाण्याची गरज भागविल्यानंतर पाणी उपलब्ध राहिल्यासच त्याचा अन्य कारणांसाठी वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले. पुढील चार ते पाच महिने कठीण असून या काळातून सर्वांना एकमेकांना धीर देत आणि सहकार्य करत मार्ग काढावा लागेल,असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सर्व आघाड्यांवर पावले उचलत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,पीक कर्जमाफीचे काम सुरू आहे.पीक कापणीचे प्रयोगही सुरू असून पीक विम्याची मदत दिली जाईल. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल.रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता असल्यास त्यादृष्टीनेही तयारी केली जाईल. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना राबविताना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. असे श्री.फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आला असून आता थेट आर्थिक मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.शेतीचे उत्पन्न हातचे गेल्यामुळे शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याची कमतरता भासणार नाही,यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. पीक नुकसान,पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा,पीक विमा, आर्थिक मदत आणि अन्नधान्य अशा सर्व पातळ्यांवर शासन नियोजन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. करजखेड्यातील पाहणीदरम्यान करपलेल्या पिकांमध्ये उभ्या असलेल्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट संवाद साधला.संकट मोठे आहे मात्र आपण सर्वजण एकमेकांना धीर देऊन आणि एकजुटीने त्यातून मार्ग काढू.शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आमदार बसवराज पाटील, राणाजगजितसिंह पाटील व अभिमन्यू पवार,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. ***************

*शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ; सरसकट मदतीचा निर्णय* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ▶️संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे ▶️येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय *कळंब तालुक्यातील मलकापूर येथील पीक नुकसानीची केली पाहणी*

*शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ; सरसकट मदतीचा निर्णय* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ▶️संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे ▶️येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय *कळंब तालुक्यातील मलकापूर येथील पीक नुकसानीची केली पाहणी* धाराशिव,दि.२३ सप्टेंबर (जिमाका) दुष्काळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे.या संकटाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून,येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कळंब तालुक्यातील मलकापूर येथे आज रामहरी लोमटे आणि संजय लोमटे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. दुष्काळाची परिस्थिती सरसकट असल्याने मदतही सरसकट देण्यात येणार आहे.मदत देताना कोणतेही आढेवेढे घेतले जाणार नाहीत.पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार करावे लागतील.मात्र,परिस्थिती सरसकट असल्याने मदतीचा निर्णयही सरसकटच असेल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा,मुलांचे शिक्षण आणि अन्नधान्य यांची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल.शेतकऱ्यांना देण्यात येणारे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे,असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत कर्जमाफी सुरू राहील,असे मुख्यमंत्री म्हणाले.शेतकऱ्यांच्या वीजबिलापोटी ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे,ही सरकारची भूमिका आहे.राज्य सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करेल,असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,आमदार सर्वश्री.बसवराज पाटील, राणाजगजीतसिंह पाटील,कैलास घाडगे पाटील,प्रवीण स्वामी,माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Tuesday, 22 September 2026

*नशामुक्त युवा घडविणे ही काळाची गरज* उपशिक्षणाधिकारी होळकर स्वाक्षरी मोहिमेतून विद्यार्थ्यांचा नशामुक्तीचा संकल्प

*नशामुक्त युवा घडविणे ही काळाची गरज* उपशिक्षणाधिकारी होळकर स्वाक्षरी मोहिमेतून विद्यार्थ्यांचा नशामुक्तीचा संकल्प धाराशिव,ता.२१ सप्टेंबर (जिमाका) देशाची प्रगती सुदृढ आणि सशक्त युवकांवर अवलंबून आहे.त्यामुळे नशामुक्त युवा पिढी घडविणे ही काळाची गरज असून, देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा ‘मी देशासाठी काय करतो ही वृत्ती युवकांनी अंगीकारावी, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी श्री. होळकर यांनी केले. माय भारत केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नशामुक्तीविषयक कार्यक्रमात ते बोलत होते.राष्ट्रपुरुषांची चरित्रे अभ्यासून युवकांनी आपल्या कृतीत सकारात्मक बदल घडवावा आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नशामुक्त युवा पिढी घडविण्याचा संकल्प केला.रील स्टार अजित शिंदे आणि अविनाश जाधव यांनी पथनाट्याद्वारे व्यसनांचे दुष्परिणाम मांडत नशामुक्तीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धाही घेण्यात आली.विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य समीर शेख,राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक मोहन राठोड आणि मराठी विभागप्रमुख श्रीमती बी. व्ही.गोंदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.वैभव आगळे आणि माय भारतचे समन्वयक वैभव लांडगे यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ.ए.के.मंजुळकर आणि माय भारतचे जिल्हा समन्वयक प्रतीक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. **************

धाराशिवमध्ये दोन दिवसीय ‘महागणेशोत्सव’ *५० कलावंतांचा सहभाग ; लावणी, लोकगीत,पोवाडा, गणपती गाण्यांसह महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर*

धाराशिवमध्ये दोन दिवसीय ‘महागणेशोत्सव’ *५० कलावंतांचा सहभाग ; लावणी, लोकगीत,पोवाडा, गणपती गाण्यांसह महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर* धाराशिव,दि.२२ सप्टेंबर (जिमाका) गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात धाराशिवकरांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकसंस्कृतीची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सवनिमित्त ‘महागणेशोत्सव’ या दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय,जिजाऊ चौक,बार्शी नाका येथे २३ व २४ सप्टेंबर रोजी दोन्ही दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. कार्यक्रमात ५० कलावंत सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन एकाच व्यासपीठावर घडणार आहे. गणेशोत्सवाचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा बाज यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून साधला जाणार आहे. लावणी,पिंगळा लोकगीत,पोवाडा, गणपती गाणी,वासुदेव,भजन,कीर्तन, भारूड आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांवर आधारित अभिनय,लोकनृत्य कार्यक्रम,तसेच शेतकरी आत्महत्या या विषयावर एकांकिका सादर करण्यात येणार आहे.त्यामुळे मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनाचाही संदेश या सांस्कृतिक सोहळ्यातून दिला जाणार आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून या महोत्सवाला व्यापक सांस्कृतिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून धाराशिवमध्ये आयोजित ‘महागणेशोत्सव’ महाराष्ट्राच्या लोककला,परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला करून देणारा ठरणार आहे. लोककलावंतांच्या सादरीकरणातून ग्रामीण संस्कृतीचा अस्सल बाजही धाराशिवकरांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना या सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.प्रवेश विनामूल्य असून,धाराशिव शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी २३ व २४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा रंगतदार सोहळा अनुभवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***************

रब्बी हंगामासाठी महाडीबीटीवर अर्ज सुरू ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य *अन्न सुरक्षा-पोषण,कडधान्य आत्मनिर्भरता व खाद्यतेल अभियानातून विविध घटकांना लाभ ; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन*

रब्बी हंगामासाठी महाडीबीटीवर अर्ज सुरू ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य *अन्न सुरक्षा-पोषण,कडधान्य आत्मनिर्भरता व खाद्यतेल अभियानातून विविध घटकांना लाभ ; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन* धाराशिव दि.२२ सप्टेंबर ( जिमाका) रब्बी हंगामाच्या तयारीला वेग येत असतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांच्या लाभाची संधी उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (अन्नधान्य व वाणिज्यिक पिके), कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) सन २०२६-२७ अंतर्गत रब्बी हंगामात राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. सन २०२६-२७ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असल्याने या योजनांचा लाभ देताना महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग लाभार्थ्यांनाही योजनांमध्ये प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. *तेलबिया पिकांसाठी हेक्टरी १४ हजारांपर्यंत अनुदान* राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत भुईमूग,सूर्यफूल आणि करडई या पिकांसाठी विविध घटक राबविण्यात येणार आहेत.गट पीक प्रात्यक्षिकासाठी भुईमुगाला १४ हजार रुपये प्रति हेक्टर, सूर्यफुलाला ९ हजार रुपये प्रति हेक्टर,तर करडईसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे.या घटकासाठी शेतकरी गट, FPO, FPC तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील. भुईमूग,सूर्यफूल आणि करडईच्या पाच वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी प्रत्येकी ११० रुपये प्रति किलो अनुदानाची तरतूद आहे.या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. *कडधान्य आत्मनिर्भरता अभियानात हरभऱ्याला मदत* कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत हरभरा पिकाच्या गट पीक प्रात्यक्षिकासाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी गट,FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील. हरभऱ्याच्या पाच वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी ६० रुपये प्रति किलो,तर पाच वर्षांवरील परंतु दहा वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी ४० रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येईल.या दोन्ही घटकांसाठी वैयक्तिक शेतकरी पात्र असतील. *ऊस-हरभरा आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी नऊ हजार रुपये* राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत ऊस पिकासाठी ‘एक डोळा पट्टा पद्धत व आंतरपीक प्रात्यक्षिक (ऊस-हरभरा)’ या घटकासाठी ९ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान उपलब्ध आहे.याच अभियानांतर्गत ‘सुपर केन नर्सरी’साठी १० हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के,यापैकी लागू असलेले अनुदान देण्यात येणार आहे.या घटकासाठी शेतकरी गट,FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील. *गहू,मका आणि रब्बी ज्वारीलाही लाभ* गहू पिकाच्या सलग गट पीक प्रात्यक्षिकासाठी ९ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान असून शेतकरी गट, FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था यासाठी पात्र असतील. मका पिकाच्या सलग गट पीक प्रात्यक्षिकासाठी ११ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार असून या घटकासाठीही शेतकरी गट, FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र आहेत.मक्याच्या दहा वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी १०० रुपये प्रति किलो अनुदान वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. रब्बी ज्वारीच्या गट पीक प्रात्यक्षिकासाठी ७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार असून शेतकरी गट,FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील.रब्बी ज्वारीच्या दहा वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी ३० रुपये प्रति किलो,तर दहा वर्षांवरील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी १५ रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येणार आहे.या बियाणे वितरणाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येईल. *अर्ज कुठे आणि कसा करायचा* इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी स्वतः अथवा नजीकच्या CSC केंद्रामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करताना योजनेनुसार ‘बियाणे वितरण’, ‘प्रात्यक्षिक’ आणि ‘सुपर केन नर्सरी’ हे संबंधित पर्याय निवडावेत. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. योजनांविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाइन अर्ज : महाडीबीटी शेतकरी पोर्टल — https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin यावर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी दिली. *****************

*अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत निकाली काढा* विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी

*अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत निकाली काढा* विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी धाराशिव दि.२२ सप्टेंबर (जिमाका) शिष्यवृत्तीचा लाभ केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला मिळण्यापासून राहू नये,यासाठी समाज कल्याण विभागाने महाविद्यालयांना प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित महाविद्यालयांनी या कामाला ‘सर्वोच्च प्राथमिकता’ देऊन विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन सहायक आयुक्त,समाज कल्याण सचिन कवले यांनी केले आहे. राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.० (Updated Version 2.0) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे.मात्र, २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.हे अर्ज निकाली काढण्यासाठी तसेच संबंधित शैक्षणिक वर्षांचे अहवाल (Reports) तयार करण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांनी २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रलंबित अर्ज ३० सप्टेंबर २०२६ अखेर पूर्णतः निकाली काढावेत,असे स्पष्ट करण्यात आले आहे. *प्रलंबित अर्जांची छाननी करून बिल जनरेट करता येणार* या मुदतवाढीच्या कालावधीत महाविद्यालये आणि संबंधित विभागांना प्रलंबित अर्जांची छाननी (Scrutiny) करता येणार असून, पात्र प्रकरणांमध्ये बिल जनरेट करण्याची प्रक्रियाही पूर्ण करता येईल.त्यामुळे जुन्या शैक्षणिक वर्षांतील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांनी उपलब्ध कालावधीचा प्रभावी वापर करावा. *‘Sent Back’ अर्जांची Re-Apply सुविधा सध्या स्थगित* विद्यार्थ्यांना ‘Sent Back’ करण्यात आलेले अर्ज पुन्हा सादर करण्याची Re-Apply सुविधा सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे.महाडीबीटी १.० वरील काम पूर्ण झाल्यानंतर आणि डेटा मायग्रेशनची प्रक्रिया झाल्यानंतर हे सर्व अर्ज MahaDBT २.० पोर्टलवर Re-Apply करण्यासाठी उपलब्ध होतील.त्यामुळे अशा अर्जांबाबत विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी नवीन प्रणालीतील पुढील प्रक्रियेची नोंद घ्यावी. *नवीन अर्ज केवळ महाडीबीटी २.० वर* १० ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत महाडीबीटी १.० पोर्टलवर कोणताही नवीन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे सर्व नवीन अर्ज केवळ MahaDBT २.० पोर्टलवरच स्वीकारण्यात येतील.महाडीबीटी १.० पोर्टलचा उपलब्ध कालावधी हा जुन्या प्रलंबित अर्जांचा निपटारा आणि आवश्यक अहवाल तयार करण्यासाठी आहे. *विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘Top Priority’* जुन्या अर्जांचा डेटा प्रलंबित राहिल्यास नवीन महाडीबीटी प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर होऊ शकतो.त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी या कामाकडे केवळ प्रशासकीय प्रक्रिया म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित बाब म्हणून गांभीर्याने लक्ष द्यावे.प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली काढून संपूर्ण कार्यवाही ‘सर्वोच्च प्राथमिकता’ (Top Priority) म्हणून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विशेषतः अर्ज वेळेत निकाली न काढल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील,याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित महाविद्यालयांनी २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील प्रलंबित अर्जांची तातडीने छाननी करून आवश्यक बिल जनरेशनसह संपूर्ण प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन सचिन कवले, सहायक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव यांनी केले आहे. ***************

Monday, 21 September 2026

समाज कल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: महाडीबीटी-२.० प्रणालीद्वारे अर्ज नोंदणी मुख्याध्यापकांनी कार्यवाही करण्याच्या सूचना

समाज कल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: महाडीबीटी-२.० प्रणालीद्वारे अर्ज नोंदणी मुख्याध्यापकांनी कार्यवाही करण्याच्या सूचना धाराशिव,दि.२१ सप्टेंबर (जिमाका) सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसह विविध पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून या योजनांसाठी महाडीबीटी-२.० प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावीमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना,तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना आदी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या अर्जांची महाडीबीटी प्रणालीद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच अनुसूचित जातीच्या पालकांनी आपल्या पाल्याचा शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळेत सादर करावीत,असे आवाहन सचिन कवले,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद, धाराशिव यांनी केले आहे. ००००००

"सेवा संकल्प अभियान" अंतर्गत तृतीयपंथीयांच्या मतदान नोंदणीसाठी २२ सप्टेंबर रोजी शिबिर

"सेवा संकल्प अभियान" अंतर्गत तृतीयपंथीयांच्या मतदान नोंदणीसाठी २२ सप्टेंबर रोजी शिबिर धाराशिव,दि.२१ सप्टेंबर (जिमाका) तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनेतंर्गत तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता जिल्ह्यात विविध शिबिरांचे आयोजन करणे, जाणीव जागृती कार्यशाळा / प्रचार प्रसिध्दी, स्वयंरोजगार मेळावे, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्य शिबिरांचे आयोजन, तृतीयपंथी व्यक्तीसाठी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु करणे व इतर तृतीयपंथीयांच्या अनुषंगाने आवश्यक बाबी राबविणेबाबत तसेच दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत "सेवा संकल्प अभियान" राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत मतदान नोंदणीकरीता २२ सप्टेंबर रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.यानुसार नवीन मतदान नोंदणीकरीता जन्म दाखला व रहिवाशी पुरावा तसेच एस.आय.आर करीता फॉर्म नं-६, स्वंयघोषणापत्र, जुने मतदान कार्ड अथवा २००२ यावर्षी आई, वडील,गुरुंनी मतदान केले असल्याची नोंद व आधार कार्ड इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या शिबीराकरीता २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे उपस्थित राहावे असे आवाहन सचिन कवले, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव यांनी केले आहे 00000