Tuesday, 22 September 2026
रब्बी हंगामासाठी महाडीबीटीवर अर्ज सुरू ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य *अन्न सुरक्षा-पोषण,कडधान्य आत्मनिर्भरता व खाद्यतेल अभियानातून विविध घटकांना लाभ ; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन*
रब्बी हंगामासाठी महाडीबीटीवर अर्ज सुरू ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य
*अन्न सुरक्षा-पोषण,कडधान्य आत्मनिर्भरता व खाद्यतेल अभियानातून विविध घटकांना लाभ ; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन*
धाराशिव दि.२२ सप्टेंबर ( जिमाका) रब्बी हंगामाच्या तयारीला वेग येत असतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांच्या लाभाची संधी उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (अन्नधान्य व वाणिज्यिक पिके), कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) सन २०२६-२७ अंतर्गत रब्बी हंगामात राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
सन २०२६-२७ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असल्याने या योजनांचा लाभ देताना महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग लाभार्थ्यांनाही योजनांमध्ये प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे.
*तेलबिया पिकांसाठी हेक्टरी १४ हजारांपर्यंत अनुदान*
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत भुईमूग,सूर्यफूल आणि करडई या पिकांसाठी विविध घटक राबविण्यात येणार आहेत.गट पीक प्रात्यक्षिकासाठी भुईमुगाला १४ हजार रुपये प्रति हेक्टर, सूर्यफुलाला ९ हजार रुपये प्रति हेक्टर,तर करडईसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे.या घटकासाठी शेतकरी गट, FPO, FPC तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील.
भुईमूग,सूर्यफूल आणि करडईच्या पाच वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी प्रत्येकी ११० रुपये प्रति किलो अनुदानाची तरतूद आहे.या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
*कडधान्य आत्मनिर्भरता अभियानात हरभऱ्याला मदत*
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत हरभरा पिकाच्या गट पीक प्रात्यक्षिकासाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी गट,FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील.
हरभऱ्याच्या पाच वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी ६० रुपये प्रति किलो,तर पाच वर्षांवरील परंतु दहा वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी ४० रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येईल.या दोन्ही घटकांसाठी वैयक्तिक शेतकरी पात्र असतील.
*ऊस-हरभरा आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी नऊ हजार रुपये*
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत ऊस पिकासाठी ‘एक डोळा पट्टा पद्धत व आंतरपीक प्रात्यक्षिक (ऊस-हरभरा)’ या घटकासाठी ९ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान उपलब्ध आहे.याच अभियानांतर्गत ‘सुपर केन नर्सरी’साठी १० हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के,यापैकी लागू असलेले अनुदान देण्यात येणार आहे.या घटकासाठी शेतकरी गट,FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील.
*गहू,मका आणि रब्बी ज्वारीलाही लाभ*
गहू पिकाच्या सलग गट पीक प्रात्यक्षिकासाठी ९ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान असून शेतकरी गट, FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था यासाठी पात्र असतील.
मका पिकाच्या सलग गट पीक प्रात्यक्षिकासाठी ११ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार असून या घटकासाठीही शेतकरी गट, FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र आहेत.मक्याच्या दहा वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी १०० रुपये प्रति किलो अनुदान वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
रब्बी ज्वारीच्या गट पीक प्रात्यक्षिकासाठी ७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार असून शेतकरी गट,FPO, FPC आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील.रब्बी ज्वारीच्या दहा वर्षांआतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी ३० रुपये प्रति किलो,तर दहा वर्षांवरील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी १५ रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येणार आहे.या बियाणे वितरणाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येईल.
*अर्ज कुठे आणि कसा करायचा*
इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी स्वतः अथवा नजीकच्या CSC केंद्रामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करताना योजनेनुसार ‘बियाणे वितरण’, ‘प्रात्यक्षिक’ आणि ‘सुपर केन नर्सरी’ हे संबंधित पर्याय निवडावेत.
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. योजनांविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाइन अर्ज : महाडीबीटी शेतकरी पोर्टल — https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin
यावर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी दिली.
*****************