Monday, 23 March 2026

*उद्योगाशिवाय पर्याय नाही : कौशल्य,भांडवल व मार्केटिंगवर भर देऊन उद्योजक व्हा* महाव्यवस्थापक अमोल बडे *उद्योजक मेळावा संपन्न*

*उद्योगाशिवाय पर्याय नाही : कौशल्य,भांडवल व मार्केटिंगवर भर देऊन उद्योजक व्हा* महाव्यवस्थापक अमोल बडे *उद्योजक मेळावा संपन्न* धाराशिव.दि.१८ मार्च (जिमाका)जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव,दे आसरा फाउंडेशन,पुणे तसेच व्यवस्थापन शास्त्र विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज एमआयडीसी येथील विद्यापीठाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात नवउद्योजकांनी उद्योग उभारणीसंदर्भातील विविध बाबींची सविस्तर माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांच्या हस्ते झाले.यावेळी एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक डी.व्ही.खाडे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तसेच दे आसरा फाउंडेशनच्या सायली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक म्हणून श्री.बळे म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीच्या संधी कमी होत आहेत.त्यामुळे उद्योगाशिवाय पर्याय उरलेला नाही.जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. कौशल्य,आर्थिक पाठबळ,शासकीय मदत आणि प्रभावी मार्केटिंग या चार टप्प्यांवर शासन उद्योजकांना सहाय्य करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र उद्योग उभारणीसाठी सदैव तयार असून विविध योजनांद्वारे ८०० पेक्षा अधिक उद्योगांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मदत करण्यात आली आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले. एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.खाडे म्हणाले की,उद्योजक होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.पूर्वी शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे हा होता,मात्र आता शिक्षणाचा उपयोग उद्योग निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूखंड,पायाभूत सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध करून उद्योगांना चालना दिली जाते.गुंतवणूक व उद्योग निर्मिती हा विकासाचा मुख्य आधार असल्याचे ते म्हणाले. श्री.खडसे म्हणाले की,धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असून येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे.त्यामुळे शेतीपूरक उद्योगांची गरज अधिक आहे.अशा उद्योगांमुळे रोजगारनिर्मिती होऊन जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावू शकते.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी उद्योगक्षेत्रात पुढे यावे.असे त्यांनी सांगितले. श्रीमती.सायली जाधव म्हणाल्या की, स्वतःचा उद्योग उभारल्यास केवळ स्वावलंबनच नव्हे तर इतरांनाही रोजगार देता येतो.उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रभावी मार्केटिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक आहे.असे त्या म्हणाल्या. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुरल एंटरप्राइजेस फायनान्स सपोर्ट कन्सल्टंट श्रीमती.पल्लवी पाटील यांनी भांडवल गुंतवणूक व आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शन केले.सनदी लेखापाल लक्ष्मण वाकुरे यांनी आयटीआर व जीएसटी रिटर्न भरताना घ्यावयाची काळजी यावर माहिती दिली.संजय देशमाने यांनी उद्योगातील आव्हाने व उपाय मांडले,तर अशोक चव्हाण (मुंबई) यांनी मार्केटिंगचे महत्त्व स्पष्ट केले. याशिवाय उद्योजक व मध उत्पादन तज्ज्ञ तेजस लिमकर यांची मुलाखत घेण्यात आली. चर्चा सत्रात उपस्थित उद्योजकांनी प्रश्नोत्तरांमध्ये सक्रिय सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संजय गुरव यांनी केले, आभार प्रदर्शन व्यवस्थापन विभाग प्रमुख सुयोग अमृतराव यांनी केले. *************