Thursday, 26 March 2026

प्रगणक-पर्यवेक्षकांची भूमिका निर्णायक ; जनगणना अचूकतेने पार पाडा निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर

प्रगणक-पर्यवेक्षकांची भूमिका निर्णायक ; जनगणना अचूकतेने पार पाडा निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर धाराशिव, दि.२६ मार्च (जिमाका) भारताची जनगणना २०२७ ही डिजिटल पद्धतीने होणारी असून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे जनगणनेचे काम काळजीपूर्वक करावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज (दि.२६) जनगणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जनगणना २०२७ प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जनगणना संचालनालय,मुंबईचे उपसंचालक तथा प्रशिक्षक किरण गुरव,सहनिरीक्षक पवन गोडे,जिल्हा समन्वयक चेतन प्रकाश,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर तसेच सहाय्यक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अंकित सिंह उपस्थित होते. यावेळी बोलताना कडवकर म्हणाले की, जनगणना २०२७ साठी तालुका पातळीवर प्रगणकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जनगणनेचे कायदे कडक असून, जाणीवपूर्वक हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. श्री.खडसे यांनी जनगणनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.ग्रामीण व शहरी भागातील विकास,रोजगार आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास यामुळे शक्य होतो.तसेच केंद्र व राज्य शासनाला विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतात.मूलभूत सुविधांचे अचूक नियोजन करता येते आणि लोकसंख्येनुसार निधीचे न्याय्य वाटप शक्य होते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे ही जबाबदारी आहे. उपसंचालक किरण गुरव यांनी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की,हे प्रशिक्षण चार्ज ऑफिसरकरिता असून पुढील दोन महिन्यांत त्यांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन केले जाईल.जनगणना दोन टप्प्यात पार पडणार असून प्रगणक प्रत्येक घरात जाऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहे.जनगणनेचे तांत्रिक पैलू,पायाभूत सुविधामाहिती संकलनाची प्रक्रिया आणि त्याचा उपयोग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यात प्रगणक कुटुंबप्रमुखाकडून ३३ प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करणार असून प्रत्येक कुटुंबाने आपल्या सोयी-सुविधांची माहिती देणे आवश्यक आहे.जनगणनेत निष्काळजीपणा केल्यास संबंधितांवर कारवाईची तरतूद आहे.ही जनगणना पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे.सन १८७२ पासूनची ही सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे.संकलित माहिती न्यायालयीन कामकाजात वापरता येणार नाही,तसेच एका प्रगणकाला काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात येणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. सहनिरीक्षक पवन गोडे यांनी सांगितले की,जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान होणार असून या कालावधीत घरयादी व घरगणना केली जाईल.दुसरा टप्पा ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान पार पडणार आहे.निर्धारित वेळेत अचूक माहिती संकलन करणे अत्यंत महत्त्वाचे असून प्रगणक व पर्यवेक्षकांची कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. या प्रशिक्षण शिबिरास चार्ज ऑफिसर म्हणून सर्व तहसीलदार, नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी,नायब तहसीलदार, तांत्रिक अभियंते,जनगणना लिपिक, तांत्रिक सहाय्यक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महा आयटी व जिल्हा सूचना व विज्ञान केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनी प्रशिक्षकांना प्रश्न विचारून जनगणनेबाबतच्या शंका निरसन करून घेतले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना कक्षाचे सहाय्यक महसूल अधिकारी (जनगणना) दीपक चिंतेवार,विशाल वाघमारे,सुजित टिके,श्रीमती मनीषा वाघमारे,महसूल सहाय्यक गहनीनाथ देवगिरे व संजय पवार यांनी परिश्रम घेतले. *****