उस्मानाबाद, दि.4:- राज्य
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट
पत्रकारिता, उत्कृष्ट
लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर
लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रवेशिका
पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31डिसेंबर, 2016 पर्यंतच्या
कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी
जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
(तळमजला, हुतात्मा
राजगुरु चौक,मादाम कामा
मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे
आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा
www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in या
संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.
राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे – बाळशास्त्री
जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत
गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव
विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी),मौलाना
अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार -
शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु.
ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार
पुरस्कार, केकी
मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार
प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह
व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे – अनंतराव
भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य
अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब
परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि.
म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग.
गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक
बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग.
त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार
रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस
पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार
रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच
याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने
करण्यात आले आहे.