Tuesday, 31 January 2017

निवडणुका शांततेत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे

जि.. ..निवडणूकीच्या कामकाजाचा घेतला आढावा


       
उस्मानाबाद, दि. 31 :- जिल्ह्यातील  जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने व सजगपणे काम करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी केले
उस्मानाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, बँक अधिकारी  तसेच सर्व विभागाचे  विभाग प्रमुख  यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याबैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तहसिलदार सुजित नरहीरे, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार  व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते .
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका शांततामय वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांत समन्वय गरजेचा आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी करावी व तेथील पोलीस बंदोबस्ताविषयी आराखडा तयार करावा. पोलीस विभागाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घ्यावी. मागील काळातील घटनांची माहिती घेऊन अशा केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा. अवैद्य दारू विक्री करणारे यांच्यावर कडक कारवाई करावी.  संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य ओळखून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक असणारे विविध समित्यांचा तसेच स्थिर तपासणी पथके व अचानक तपासणी करणारी पथके, मतदान यंत्र, अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जनजागृती इत्यादी बाबीविषयी सविस्तर आढावा घेवून योग्य त्या सूचना केल्या. तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रेणेने अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले