Sunday, 29 January 2017

‘मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्न करु’ -जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


    उस्मानाबाद.दि.27:-  मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असून हा दर सरासरीपेक्षा अधिक होण्यासाठी गतीने प्रयत्न करण्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केला.
             बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्ल उस्मानाबाद शहरातील आर्य चाणक्य विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, लोकलेखा समितीच्या अध्यक्षा सौ.सुषमा मिलिंद पाटील, सदस्य डॉ.अभय शहापूरकर, कमलाकर पाटील, शेषाद्री डांगे, जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, प्राचार्या डॉ. अनार साळुंके, मुख्याध्यापक डॉ.मनीष देशपांडे, मुख्यमंत्री मित्र बालाजी पवार आदींची मान्यवर उपस्थित होते.
           यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, बेटी-बचाओ बेटी-पढाओ या अभियानात उस्मानाबाद जिल्हयाला देशपातळीवर प्राप्त झालेला गौरव हा जिल्हावासीयांच्या एकत्रित सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी सर्व घटकांपर्यंत पोहोंचून मुलीच्या जन्माचा दर 804 वरून 920 पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले. गर्भलिंग निदान चाचणी कायदयाची जनजागृती केली. तसेच यासंबंधी प्रसंगी गुन्हे दाखल केले. सर्व आरोग्य यंत्रणा, महसूल प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सरपंच आणि लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी हा विषय जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे आपल्या जिल्हयाला हे यश प्राप्त झाले. आगामी काळात मुलींच्या जन्माचा          दर केरळ प्रमाणे सरासरी पेक्षा अधिक वाढवण्यासाठी ही अशाच सामूहिक प्रयत्नांची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.         
 मुलींच्या जन्माचा दर वाढल्यास जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक वाढले आणि विकासाला चालना मिळेल असेही डॉ. नारनवरे यावेळी म्हणाले.
          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसेवा समितीचे सदस्य डॉ. अभय शहापूरकर यांनी केले, त्यात त्यांनी लोकसेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या बेटी-बचाओ बेटी-पढाओ या कार्यक्रमातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उस्मानाबाद जिल्हयाला देशपातळीवर नेण्यात डॉ.नारनवरे यांचे कार्य सर्वांसमोर यावे या उद्देशाने त्यांच्या सत्काराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने आर्य चाणक्य विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या महिला     पालकांचा हळदी कुंकू तीळ गुळ वाटप कार्यक्रम आणि बेटी बचाओ- बेटी पढाओ या संकल्पनेतून साकारलेल्या नयनरम्य रांगोळया, जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यांची वैशिष्टये दाखवणाऱ्या आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे ही डॉ. शहापूरकर यांनी सांगितले.
          या कार्यक्रमात आर्य चाणक्य विद्यालयातील आशिष सुरेश यरकळ इयत्ता 8 वी या विद्यार्थ्यांचा मैसूर, कर्नाटक येथील राष्ट्रीय स्काऊट सहभागाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

          या महिला मेळाव्याच्या आणि सत्कार समारंभाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्हयाची वैशिष्टये तालुकानिहाय रंगीत वैशिष्टयांनी दर्शविणाऱ्या तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेतून साकारलेल्या रांगोळयांनी उपस्थितांची मने जिंकली. या रांगोळया साकारणाऱ्या सौ. पवार आणि सौ. देशमाने यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार सौ. सुषमा पाटील यांनी मानले. तर सूत्रसंचलन श्री. जगताप सर यांनी केले. कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती ॲड.मिलींद पाटील, संस्थाचालक श्री संजय देशमुख, तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.