Sunday, 16 August 2026
उंच भगवा केवळ ध्वज नव्हे; स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक पालकमंत्री प्रताप सरनाईक
उंच भगवा केवळ ध्वज नव्हे; स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक
पालकमंत्री प्रताप सरनाईक
४५ मीटर उंच स्वराज्य ध्वजचे उद्घाटन
धाराशिव दि.१५ ऑगस्ट (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेला ४५ मीटर उंच भगवा ध्वज हा केवळ ध्वज नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला, स्वाभिमानाला आणि स्वराज्याच्या विचारांना नमन करणारे ऐतिहासिक प्रतीक आहे.या भगव्याकडे पाहताना प्रत्येक तरुणाने ‘महाराजांनी आपल्या काळात स्वराज्यासाठी काय केले आणि आपण आपल्या काळात समाजासाठी काय करणार हा प्रश्न स्वतःला विचारावा.इतिहासातून प्रेरणा घेऊन आधुनिक,सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया,असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज १५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंच भगवा ध्वजाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी केले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती. अर्चना पाटील,खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीमती.उषा गायकवाड,नगराध्यक्ष नेहा काकडे व उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सुरज साळुंके,नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे वर्णन करताना त्यांनी हा दिवस धाराशिवच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा अभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले.आकाशाला गवसणी घालणारा हा भगवा पराक्रम, त्याग,धर्म-संस्कृतीच्या रक्षणाची भावना आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,बलाढ्य सत्तांविरुद्धचा संघर्ष या प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी बुद्धिमत्ता,धैर्य आणि दूरदृष्टीचा आदर्श निर्माण केला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वाभिमान सोडू नये,हा संदेश देत राहील,असे सरनाईक म्हणाले.
महाराजांनी केवळ युद्ध जिंकले नाही,तर माणसांची मने जिंकली असे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,शेतकरी हा स्वराज्याचा कणा,प्रजेचे कल्याण हे राजाचे कर्तव्य,स्त्रियांचा सन्मान हा राजधर्म आणि प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असले पाहिजे,ही मूल्यव्यवस्था त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून रुजविली.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे राजे नसून सुशासन,नेतृत्व,सामाजिक न्याय आणि राष्ट्रभक्तीचे आदर्श आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आजच्या काळातील ‘स्वराज्य’ म्हणजे सुशासन,पारदर्शक प्रशासन,सुरक्षित समाज,सक्षम युवक,समृद्ध शेतकरी,सन्मानाने जगणारा नागरिक आणि विकासाच्या संधी प्रत्येकापर्यंत पोहोचणे होय असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,आपल्या मुलांच्या हातात तलवार नव्हे,तर ज्ञान,कौशल्य आणि तंत्रज्ञानाची ताकद देण्याची गरज आहे. तरुणांच्या मनात द्वेष नव्हे,तर स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती निर्माण केली पाहिजे.छत्रपतींनी समुद्राला सीमा न मानता संधी बनवली; त्याच दूरदृष्टीने आजच्या पिढीने विज्ञान,तंत्रज्ञान,शिक्षण,उद्योग आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवी क्षितिजे गाठावीत,असे आवाहन त्यांनी केले.
हा भगवा ध्वज केवळ चौकाची ओळख ठरू नये,तर प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वराज्याची भावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागविणारा ठरावा असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, ‘धाराशिवचा विकास करू, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू, तरुणांना संधी देऊ,शेतकऱ्याला बळ देऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत महाराष्ट्राला देशातील सर्वांत प्रगत व सक्षम राज्य बनवू,’असा संकल्प या भगव्याखाली करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
श्रीमती पाटील म्हणाल्या की,हा स्वाभिमानाचा ध्वज आहे.शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला.ज्याप्रमाणे धाराशिव येथे हा ध्वज उभा आहे तसाच ध्वज तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ देखील उभारण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्र्यांकडून व्यक्त केली.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले तर या भुतलावर त्यांच्या विचाराचे राज्य येईल.या स्वराज ध्वजाची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी.शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा ध्वज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष श्रीमती.नेहा काकडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

