Sunday, 16 August 2026
तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच; भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार पालकमंत्री प्रताप सरनाईक
तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच; भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार
पालकमंत्री प्रताप सरनाईक
तुळजापूर येथे सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे लोकार्पण
धाराशिव,दि.१४ ऑगस्ट (जिमाका)आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरमध्ये येतात.या भाविकांची तसेच नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून,‘सुरक्षित तुळजापूर ही केवळ शासनाची जबाबदारी नसून सर्वांची सामूहिक बांधिलकी आहे. तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच मिळाले असून त्यामुळे भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
तुळजापूर शहर सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी पोलिस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.सरनाईक म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याच्या सन २०२४-२५च्या वार्षिक नियोजनातून सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.तुळजापूर शहरातील ६२ महत्त्वाच्या ठिकाणी २३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून,नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ३० ठिकाणी स्पीकर आणि धोकादायक अथवा महत्त्वाच्या परिस्थितीची सूचना देण्यासाठी १५ ठिकाणी अलार्म सिस्टिम उभारण्यात आली आहे.गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यापेक्षा गुन्हा घडूच नये,यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा मजबूत करणे महत्त्वाचे आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा तपास,वाहतूक नियंत्रण तसेच संशयास्पद हालचालींवर तातडीने लक्ष ठेवणे शक्य होणार असून,महिला व मुलींच्या सुरक्षिततेलाही त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
तुळजापूरला दररोज २५ ते ३० हजार,तर सुट्टीच्या दिवशी सुमारे ४० हजार भाविक भेट देतात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,नवरात्र महोत्सवात ही संख्या लाखोंच्या घरात जाते.त्यामुळे शहराच्या विकासासोबतच सुरक्षिततेच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे.आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक सुरक्षितपणे तुळजापूरमध्ये यावा,शांततेत दर्शन घ्यावे आणि सुरक्षितपणे आपल्या घरी परत जावा,ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.या प्रकल्पामुळे तुळजापूर अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून विकसित होण्यास मदत होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती.पाटील म्हणाल्या की,तुळजापुरला आलो की आपण आता सुरक्षित आहोत, ही भावना येथे आज लावलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पामुळे सिद्ध होईल. शहराच्या विकासासाठी आपले सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.शहराला या सीसीटीव्हि प्रकल्पामुळे सुरक्षितता येण्यास मदत झाली आहे.त्यामुळे गुन्हेगारीला व अनुचित प्रकाराला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,आज एका उत्कृष्ट प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे.आधुनिक प्रणालीत जिल्हा आघाडीवर आहे.जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा तत्पर आहे. सीसीटीव्ही तंत्रज्ञान अत्याधुनिक किती वापरले आहे.नवरात्रीच्या काळात ४० लाखांपेक्षा जास्त भाविक तुळजापूर येथे येतात.त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कोणताही अनुचित प्रकार येथे घडवू नये यासाठी हा प्रकल्प शहरासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीमती.खोकर म्हणाल्या की,पोलिसांची सुरक्षा सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका आहे.बदलत्या काळानुसार गुन्हेगारी बदलत आहे.नवीन प्रकारचे गुन्हे घडत आहे.कोणताही गुन्हा घडतो तेव्हा सीसीटीव्ही फुटेज आहे का हे देखील विचारले जाते.त्यामुळे येथे सीसीटीव्ही फुटेज बसविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला.जागतिक दर्जाचे हे श्रद्धास्थान आहे.भाविक व नागरिकांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.शहरात येणारी व जाणारी वाहने या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये निदर्शनास येणार आहे.त्यामुळे आता गुन्हे शोधण्यास मदत होणार आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूचना पण देता येणार आहे.आधुनिक पद्धतीची सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे.धाराशिव पोलीस सुरक्षेसाठी तत्पर असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ (सर्वसाधारण) अंतर्गत तुळजापूर शहर सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाच्या कोनशीलेचे तसेच सीसीटीव्ही कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.तर उपस्थितांचे त्यांच्या आभार अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी मानले.
*******"*

