Monday, 17 August 2026

जलसंधारण : दुष्काळी धाराशिवच्या विकासाची जीवनरेखा

जलसंधारण : दुष्काळी धाराशिवच्या विकासाची जीवनरेखा २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाच्या इतिहासात सुधाकरराव नाईक यांचे योगदान विशेष महत्त्वाचे मानले जाते.राज्यात पाणी अडवा,पाणी जिरवा या संकल्पनेला व्यापक स्वरूप देत त्यांनी जलसंधारणाच्या लोकचळवळीची पायाभरणी केली.ग्रामीण भागातील जलटंचाई दूर करण्यासाठी आणि शेतीला शाश्वत आधार देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही मार्गदर्शक ठरतात.महाराष्ट्राच्या अनेक भागांप्रमाणेच धाराशिव जिल्ह्यालाही कमी व अनियमित पर्जन्यमानाचा सामना करावा लागतो. जिल्ह्याच्या भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीमुळे येथे पाण्याचे नियोजन हा केवळ विकासाचा विषय नसून अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे जलसंधारणाचे महत्त्व या जिल्ह्यासाठी अधिक अधोरेखित होते. धाराशिव जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.त्यातही हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित झाले आहे.काही दिवसांत अतिवृष्टी तर उर्वरित काळात दीर्घ खंड अशी परिस्थिती निर्माण होत आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जाते आणि भूजल पुनर्भरणाची संधी कमी होते.याचा परिणाम विहिरी, बोअरवेल,तलाव आणि जलाशयांतील पाणीसाठ्यावर दिसून येतो. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे.सोयाबीन, तूर,हरभरा,ऊस ज्वारी यांसारख्या पिकांवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.मात्र शेतीचे यश पावसावर अवलंबून असल्याने प्रत्येक दुष्काळी वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान निर्माण करते.अशा परिस्थितीत जलसंधारण ही शेतीला स्थैर्य देणारी सर्वात प्रभावी उपाययोजना ठरते.शेततळे,बंधारे,गाळ काढणे, नाला खोलीकरण,मृद व जलसंधारणाची कामे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यामुळे जमिनीत पाणी मुरते,भूजलपातळी वाढते आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ होते. जलसंधारणाचा लाभ केवळ शेतीपुरता मर्यादित राहत नाही.पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढते,पशुधनासाठी पाणी उपलब्ध होते,ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते.जलसंपन्न गावांमध्ये सामाजिक व आर्थिक विकासाचा वेग अधिक असल्याचे अनेक उदाहरणांमधून दिसून आले आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाच्या विविध उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत.तथापि,वाढती लोकसंख्या, बदलते हवामान आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही.प्रत्येक नागरिकाचा त्यात सहभाग आवश्यक आहे.घरगुती पातळीवर पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, विहिरी व तलाव स्वच्छ ठेवणे, वृक्षारोपण आणि जलस्रोतांचे संरक्षण यांसारख्या कृतींमधून नागरिक मोठे योगदान देऊ शकतात.गावपातळीवर लोकसहभागातून उभारलेली जलसंधारणाची कामे अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन ठरतात,हा अनुभव राज्यातील अनेक यशस्वी गावांनी दिला आहे. आज जलसंधारणाचा विचार केवळ पाणी साठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.तो पर्यावरण संवर्धन,कृषी विकास, ग्रामीण समृद्धी आणि भविष्यातील जलसुरक्षा यांच्याशी थेट जोडलेला आहे.त्यामुळे सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जलसंधारण दिनाचे महत्त्व केवळ स्मरणापुरते नसून कृतीची प्रेरणा देणारे आहे. दुष्काळी परिस्थितीशी सातत्याने सामना करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यासाठी जलसंधारण ही विकासाची जीवनरेखा आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जिरविणे आणि जपून वापरणे ही काळाची गरज आहे.शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाली तरच जलसमृद्ध धाराशिवचे स्वप्न साकार होईल.जलसंधारणाची संस्कृती रुजविणे हीच सुधाकरराव नाईक यांना खरी आदरांजली ठरेल. संकलन जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव