Thursday, 20 August 2026
मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबत
मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ; बँकांना मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार कार्यवाही करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.२० ऑगस्ट (जिमाका) राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ सुरू केली आहे.या योजनेची अंमलबजावणी सुरू असून सध्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.महा-आयटीने प्रसिद्ध केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील काही शेतकरी मयत असल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकत नाही. अशा शेतकऱ्यांची कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र असली,तरी शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय या कर्जखात्यांना लाभ देता येत नाही.
त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेमध्ये पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या मयत शेतकऱ्यांची माहिती काढून त्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याबाबत महा-आयटीमार्फत मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.बँकांनी वारसांची नोंद करावी.
बँकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमधील संबंधित कर्जदार शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झाल्याची माहिती वारसाकडून प्राप्त झाल्यानंतर, बँकेच्या प्रचलित धोरणाप्रमाणे मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वारसांची नोंद करून घ्यावी.बँकेने कर्जखात्यावर मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद केल्यानंतर योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Upload Deceased Accounts’ या सुविधेमार्फत वारसांची माहिती अपलोड करावी.
बँकेने मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे हिस्से (Share) कर्जखात्यामध्ये नमूद करावेत.तसेच मयत शेतकऱ्यांऐवजी वारस खातेदारांची वैयक्तिक माहिती नमुना तक्त्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी.यामध्ये St. No, BR-ID, Heir No., Legal Heir Name, Legal Aadhar No.,Date of Birth, Gender, Mobile Number, AgriStack Registry,CIF, Saving Account Number, PACS ID,PACS Membership Number, Loan Account Number, Percentage of Share in Loan या माहितीचा समावेश राहील.
एकाच फाईलमध्ये माहिती अपलोड करावी
महा-आयटीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर ‘Upload Deceased Accounts’ या सुविधेमधून माहिती अपलोड करताना केवळ मयत शेतकऱ्यांशी संबंधित पूर्वीचा BR-ID आणि पूर्वीचा कर्ज खाते क्रमांक यासह कर्जखात्याची माहिती एकाच फाईलमध्ये अपलोड करावी.
ही माहिती अपलोड करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत संबंधित शासकीय लेखापरीक्षकामार्फत कर्जखात्याची तपासणी करण्यात यावी.
पात्र कर्जखात्यांची यादी नव्याने प्रसिद्ध होणार
बँकांमार्फत अपलोड करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीचे महा-आयटीमार्फत योजना निकषानुसार संस्करण करण्यात येईल.या संस्करणानुसार लाभासाठी पात्र असलेल्या कर्जखात्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह नव्याने आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात येईल.
योजनेच्या निकषानुसार प्रत्येक वारसाने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहील.तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी अथवा प्रमाणीकरणावेळी ॲग्रीस्टॅक नोंदणी / Farmer ID असणे आवश्यक राहील.
मयत कर्जखात्यास एकापेक्षा अधिक वारस असल्यास, योजनेच्या निकषानुसार कर्ज रकमेमधील वारसांच्या हिश्श्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात वर्ग केली जाईल. वारस अपात्र असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मयत कर्जदारांच्या वारसांची नोंद करण्यासाठी तात्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधून बँकेकडे त्यांच्या वारसांची नोंद करून घ्यावी आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
००००००