Thursday, 20 August 2026
दुष्काळी धाराशिवच्या जलसंधारणाला जलयुक्त शिवार २.०’चा आधार ६,६९२ कामे पूर्ण ; ३,९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा, ९३८.९० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
दुष्काळी धाराशिवच्या जलसंधारणाला
जलयुक्त शिवार २.०’चा आधार
६,६९२ कामे पूर्ण ; ३,९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा, ९३८.९० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
धाराशिव,दि.२० ऑगस्ट (जिमाका) दुष्काळ,कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या लहरीपणामुळे पाण्याचे आव्हान कायम असलेल्या धाराशिव जिल्ह्यात जलसंधारणाची कामे म्हणजे केवळ मातीचे बांध,नाले आणि चर नव्हेच तर शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी साठवून ठेवलेली पाण्याची आशा आहे.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून तो शेतीसाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपयोगात आणण्याच्या या प्रयत्नांना ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’मुळे अधिक व्यापक दिशा मिळाली आहे.येत्या २१ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जलसंधारण दिनाच्या निमित्ताने धाराशिवमध्ये या अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांकडे पाहिले,तर दुष्काळी भूमीत पाणी अडविण्याची आणि जमिनीत मुरविण्याची एक मोठी लोकचळवळ आकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत जिल्ह्यात एकूण १६३ गावांची निवड करण्यात आली आहे.या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद विभाग,वन विभाग,वरिष्ठ भूवैज्ञानिक,जिल्हा भूजल आणि सर्वेक्षण विकास यंत्रणा आणि मृद व जलसंधारण विभाग कार्यरत आहेत.विविध विभागांच्या समन्वयातून जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली असून,गावागावांत स्थानिक परिस्थितीचा विचार करून पाणी अडविणे,ते जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी अधिकाधिक उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे.
६ हजार ९१९ कामांचा आराखडा : ६ हजार ६९२ कामे पूर्ण
जिल्ह्यात विशेष निधी अंतर्गत १ हजार ३७४,तर अभिसरण अंतर्गत ५ अंतर्गत ५४५,अशी एकूण ६ हजार ९१९ कामे मंजूर करण्यात आली आहेत.या कामांसाठी ७६ कोटी १४ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.आज अखेर ६ हजार ६९२ कामे पूर्ण झाली आहेत.
ही आकडेवारी केवळ कागदावरील कामांची संख्या नाही.प्रत्येक पूर्ण झालेले काम म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडविण्याची एक संधी,जमिनीला ओलावा देणारा एक प्रयत्न आणि शेतकऱ्याच्या पिकाला आधार देणारा एक हात आहे.
३ हजार ९१६.८० स.घ.मी. अतिरिक्त पाणीसाठा
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत पूर्ण झालेल्या विविध जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यात सुमारे ३ हजार ९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.त्याचबरोबर ९३८.९० हेक्टर क्षेत्रवर सिंचन होत आहे.दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने सामना करणाऱ्या धाराशिवसारख्या जिल्ह्यासाठी ही बाब विशेष महत्त्वाची आहे.पावसाळ्यात काही तासांत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते.हेच पाणी जर गावाच्या शिवारात अडवून ठेवले,जमिनीत मुरवले आणि त्याचा साठा निर्माण केला,तर त्याचा परिणाम केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित राहत नाही.जमिनीतील ओलावा टिकतो,विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीला आधार मिळतो,सिंचनाची क्षमता वाढते आणि पिकांना पाण्याची उपलब्धता सुधारते.त्यामुळे जलसंधारणाची प्रत्येक रचना ही भविष्यातील पाण्याची शाश्वती निर्माण करणारी गुंतवणूक ठरते.
शिवारात विविध जलसंधारण रचना
‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत विभागांकडून सिमेंट नाला बांधणे, कंपार्टमेंट बंडिंग,सलग समतल चर (CCT),खोल सलग समतल चर (Deep CCT),गेटेड बंधारे,गॅबियन बंधारे,रिचार्ज शाफ्ट आणि नाला खोलीकरण अशा विविध प्रकारची कामे करण्यात येत आहेत.
या कामांचा उद्देश केवळ पाणी साठविणे एवढाच नाही.पावसाचे पाणी शक्य तितके शिवारात अडवून ते जमिनीत मुरवणे, मातीची धूप रोखणे,भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीला उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढविणे,हा या कामांचा व्यापक उद्देश आहे.
भूजल पातळी वाढली तर शेतीला आधार
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे.पावसाची अनिश्चितता ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या आहे.अशा परिस्थितीत पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळत आहे.भूजल पातळी वाढली,तर विहिरींमध्ये अधिक काळ पाणी टिकण्यास मदत होते.सिंचनासाठी उपलब्धता वाढते.खरीपाबरोबरच रब्बी हंगामातील शेतीची शक्यता वाढते.पिकांना महत्त्वाच्या टप्प्यावर पाणी मिळाल्याने उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.परिणामी शेतकऱ्याच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा सकारात्मक हातभार लागतो.
‘पाणी अडवा,पाणी जिरवा’पासून शाश्वत जलसुरक्षेपर्यंत
जलसंधारण ही केवळ एका विभागाची जबाबदारी नाही.पाणी हा शेती,गाव आणि ग्रामीण जीवनाचा आधार आहे.त्याच्या संवर्धनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आणि स्थानिक सहभाग आवश्यक आहे. ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’मध्ये कृषी विभाग,जिल्हा परिषद विभाग,वन विभाग,जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच मृद व जलसंधारण विभाग एकत्रितपणे काम करत आहेत.या समन्वयामुळे जलसंधारणाच्या कामांना व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात एकूण विशेष निधी व अभिसरणअंतर्गत ६ हजार ९१९ एकूण मंजूर कामांपैकी ६हजार ६९२ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामधून निर्माण झालेला ३ हजार ९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा आणि ९३८.९० हेक्टर सिंचनाचा लाभ हे या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करतात. मात्र,यापलीकडे या अभियानाचे खरे यश गावातील विहिरींमध्ये टिकणाऱ्या पाण्यात,शेतात उभ्या राहणाऱ्या पिकात आणि पावसाकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येते.
दुष्काळी भूमीत पाण्याची आशा
धाराशिवची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून झाली असली,तरी जलसंधारणाच्या माध्यमातून या परिस्थितीत बदल घडविण्याची क्षमता जिल्ह्यात आहे.पाऊस कमी असला तरी उपलब्ध पावसाचा प्रत्येक थेंब जपणे,तो शिवारात अडवणे आणि जमिनीत मुरवणे,हा त्यासाठीचा व्यवहार्य मार्ग आहे.आज जलसंधारणाच्या कामांकडे केवळ विकासकाम म्हणून न पाहता शेतीच्या भवितव्याशी आणि ग्रामीण जीवनाच्या सुरक्षिततेशी जोडलेले अभियान म्हणून पाहण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० त्याच दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
जलसंधारण दिनाच्या निमित्ताने संदेश
एकच—पाऊस किती पडतो यापेक्षा पडलेला पाऊस किती अडवतो आणि किती जमिनीत मुरवतो,हे महत्त्वाचे. दुष्काळी धाराशिवच्या शिवारात जलसंधारणाच्या कामातून निर्माण होणारा प्रत्येक थेंब भविष्यातील शेतीची, पिण्याच्या पाण्याची आणि ग्रामीण समृद्धीची आशा घेऊन येत आहे.जलयुक्त शिवार अभियान २.० च्या माध्यमातून हीच आशा आता अधिक बळकट होत आहे.
******