Sunday, 12 April 2026

पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण धाराशिव,दि.१२ एप्रिल (जिमाका) महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखला गेला पाहिजे.पत्रकारांचे कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेने आणि व्रतस्थ भावनेने पार पाडले जाते.त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद,धाराशिव येथे दैनिक ‘पुण्य नगरी’च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त कूपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण,‘पुण्य पुरस्कार’ तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक होते. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,नगराध्यक्ष नेहा काकडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव,सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य,कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष श्रीकांत कदम व अब्बास सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले ५६७ निर्णय हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी होते.‘लाडकी बहीण’ योजनेला सुरुवातीला विरोध झाला,मात्र ही योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने अतिरिक्त सहा हजार रुपयांची भर घातली असून, एनडीआरएफपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही घेतला.आपत्तीग्रस्तांना दिवाळीपूर्वीच ३२ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांना थेट सेवा देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. “माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे,असे सांगत शिंदे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्याचा संकल्प व्यक्त केला.मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १८६८ कोटी रुपयांच्या आराखड्याची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी देवी तसेच दैनिक ‘पुण्य नगरी’चे संस्थापक संपादक कै.मुरलीधरआप्पा शिंगोटे आणि कै.अनंत भालेराव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना ‘पुण्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सहकार क्षेत्रातील कार्यासाठी हभप वसंतराव नागदे,उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी ॲड.व्यंकटराव गुंड, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. दिग्गज दापके-देशमुख,महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना माने,शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी बाळासाहेब जमाले,व्यसनमुक्ती कार्यासाठी डॉ. संदीप तांबारे,शेती व उद्योग क्षेत्रातील प्रगतीसाठी हणमंत गवळी व विठ्ठल चौधरी तसेच आदर्श सरपंच म्हणून अमर सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार विविध गटांतील विजेत्यांना प्रदान करण्यात आले. शोधवार्ता गटात बालाजी वडजे प्रथम,अमोल मुळे द्वितीय,राजहंस कांबळे व रोशन मुल्ला तृतीय तर विशेष वार्ता गटात माधव आटकोटे प्रथम,रमेश कदम द्वितीय,दिपक बारकुल व डॉ.रविंद्र भताने तृतीय ठरले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ******