Saturday, 18 April 2026

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू धाराशिव दि.१८ एप्रिल (जिमाका) एप्रिल महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव,स्पर्धा,सभा, बैठका तसेच धरणे- आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली आहे.दि.१२ ते २२ एप्रिल दरम्यान संत गोरोबा काका यात्रा (तेर) तसेच दि.१४ ते ३० एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,दि.१९ एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (पारंपारिक), महात्मा बसवेश्वर जयंती,परशुराम जयंती असे विविध यात्रा व उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारणे तसेच बौद्ध समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याच्या कारणावरून दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून विविध मागण्यांसाठी शासकीय कार्यालयांसमोर धरणे,मोर्चे, आंदोलन,उपोषण,आत्मदहन,बंद, निदर्शने,तालाठोको व रास्तारोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये दि.१६ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते दि.३० एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार,शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी शस्त्र,काठी,तलवार,बंदूक बाळगण्यास मनाई आहे.तसेच लाठ्या,शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील अशा वस्तू जवळ बाळगणे,क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये,दगड किंवा क्षेपणास्त्रासारखी उपकरणे साठवणे किंवा जवळ ठेवणे यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच आवेशपूर्ण भांडणे,अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणे,सभ्यता व नीतिमत्तेला बाधा येईल किंवा अराजक निर्माण होईल अशा प्रकारच्या घोषणा,फलक किंवा चिन्हे वापरण्यास बंदी आहे.व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील अशा उद्देशाने वाद्य वाजवणे किंवा असभ्य वर्तन करणेही निषिद्ध आहे. याशिवाय,पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर एकत्र जमण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र,हा आदेश कामावर असलेल्या पोलीस अधिकारी,शासकीय कर्मचारी,विवाह समारंभ, अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम,यात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नसल्याचेही अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे. ******