Friday, 17 April 2026

धाराशिवच्या सर्वांगीण प्रगतीस नवी दिशा शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशक आराखड्याचे प्रकाशन

धाराशिवच्या सर्वांगीण प्रगतीस नवी दिशा शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशक आराखड्याचे प्रकाशन धाराशिव दि.१७ एप्रिल (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘शाश्वत विकास ध्येय-जिल्हा निर्देशक आराखडा, धाराशिव जिल्हा’ या सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या दोन पुस्तकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई यांच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई येथील अतिरिक्त आयुक्त श्री.भांगे,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पुंडलिक गोडसे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्र. उपआयुक्त श्री.सु.न.जाधव तसेच सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी,सोलापूर श्रीकांत कुंटला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय,धाराशिव येथील कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाश्वत विकासाच्या विविध निर्देशकांवर आधारित तयार करण्यात आलेला हा आराखडा जिल्ह्याच्या नियोजन प्रक्रियेस दिशा देणारा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. जिल्हा निर्देशक विकास आराखडा हा केवळ आकडेवारीचा संच नसून, जिल्ह्याच्या विकासाचा मार्गदर्शक नकाशा आहे.शिक्षण,आरोग्य,पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन,महिला व बालकल्याण, रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी या आराखड्यात ठोस निर्देशक निश्चित करण्यात आले आहेत.यामुळे विकासाच्या कामांना अधिक पारदर्शकता, परिणामकारकता आणि गती मिळणार आहे.तसेच,या आराखड्याच्या माध्यमातून प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेणे सुलभ होणार असून,उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून जिल्ह्याच्या गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवता येणार आहे.परिणामी,शाश्वत आणि समतोल विकास साध्य करण्यासाठी हा आराखडा मार्गदर्शक ठरेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. *****