Thursday, 16 April 2026

विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना नवी दृष्टी : १७२ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे

विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना नवी दृष्टी : १७२ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे धाराशिव,दि.१६ एप्रिल (जिमाका) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात येत असून,या उपक्रमाअंतर्गत ९ मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यातील १७२ विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.आरोग्य तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात आली.आवश्यकतेनुसार विविध नंबरचे चष्मे विद्यार्थ्यांना देण्यात आले.तसेच गरजू विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा (Referral Services) उपलब्ध करून देण्यात आली. ही मोहीम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.एस.चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.एस.फुलारी यांच्या सूचनेनुसार तपासणी पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जात आहे. राज्यात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी ठरत असून कुपोषणाचा प्रश्न कमी करणे आणि बालमृत्यूचे प्रमाण घटविणे हे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात २० आरोग्य पथकांद्वारे वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील व एक वेळा शाळेतील बालकांची नियमित तपासणी केली जाते. शून्य ते १८ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये ‘४ डी’ म्हणजे जन्मजात व्यंग,पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब आणि विविध आजार यांचे निदान व उपचार केले जातात.तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) अंतर्गत शून्य ते ६ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये जन्मजात आजार, अवयवांच्या उणीवा किंवा विकासातील अडथळे आढळल्यास वेळेत शस्त्रक्रिया व औषधोपचार करून भविष्यातील गंभीर गुंतागुंती टाळण्यास मदत होते. "अनेक मुलामुलींना झाला लाभ” हृदयरोग,नेत्ररोग,आकडी व फेफरे यांसारख्या आजारांवर मोठ्या प्रमाणात शिबिरे आयोजित करून निदान व उपचार करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील अनेक मुलामुलींना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झाला असून अनेकांवर हृदय शस्त्रक्रिया तसेच इतर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. अंगणवाडी तपासणीदरम्यान कुपोषित बालकांचे निदान करून त्यांना पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे संदर्भित करण्यात येते.याठिकाणी उपचारासोबत पालकांना बुडीत मजुरीचा लाभ देखील दिला जातो. जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.एस. चाकुरकर यांनी केले आहे. *****