Thursday, 22 February 2018

सामुदायिक विवाह सोहळ्यातील बालविवाह रोखण्यात यश




उस्मानाबाद,दि.22:-  उस्मानाबाद जिल्हयाच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क सोनारी या ठिकाणच्या सामुदायिक विवाह सोहळयात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास महिला व बाल विकास कार्यालयास यश मिळाले आहे.
            महिला व बाल विकास कार्यालयाने बालविवाह रोखल्यानंतर, अल्पवयात लग्न करणार नाही असे वचन मुलीच्या पालकांनी यावेळी पथकाला दिले.
            जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडून दि. 18 फेब्रुवारी 2018 रोजी अल्पवयीन बालिकेचा बाल विवाह होणार असल्याची माहिती मिळताच, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्याचे संरक्षण अधिकारी श्री. घाडगे आर.जी., बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विभावरी खुने, ग्रामसेवक कटकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश साबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माळी एस.बी., परिवेक्षिका श्रीमती गायकवाड के.ए., विस्तार अधिकारी श्री. कावळे ए.सी., ग्रामपंचायत कर्मचारी परमेश्वर पवार, अंगणवाडी मदतनीस श्रीमती परमीन जाधव यांनी संयुक्तपणे मुलीचे माता-पिता व नातेवाईकांचे समुपदेशन करुन हा बालविवाह थांबविण्यात यश प्राप्त केले आहे.
            याकामी भैरवनाथ साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र शेलार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, अशी माहिती  जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. अशोक सावंत यांनी दिली आहे.