Thursday, 22 February 2018

अंगणवाडीतील बालकांसाठी सुरु झाली ग्राम बाल विकास केंद्र




उस्मानाबाद,दि.22:-  जिल्हयातील 170 अंगणवाडयामधून 248 बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्राचा शुभारंभ आज दि. 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. मौजे तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथील ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन महिला व बाल कल्याण जिल्हा परिषदेच्या सचिव श्रीमती सखुताई पवार यांच्या हस्ते झाले.
            यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार, तेरखेडा जिल्हा परिषद सदस्य श्री. उध्दव साळवी, पंचायत समिती सदस्या श्रीमती रुपालीताई घोलप, तेरखेडा सरपंच श्रीमती त्रिशालाबाई खामकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. निपाणीकर बी.एच. यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व बाल कल्याण जिल्हा परिषदेच्या सचिव श्रीमती सखुताई पवार व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार यांनी ग्राम बाल विकास केंद्राचा उद्देश व कुपोषण निर्मूलना संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली उपाययोजना याबाबतची माहिती दिली आणि 2022 पर्यंत उस्मानाबाद जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
6 वर्षाखालील कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी गाव पातळीवर 4 ते 12 आठवडयाच्या कालावधीत वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या निरीक्षणाखाली आरोग्य सेवा व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत अतिरिक्त आहार देणे., प्रशिक्षणाद्वारे मातांचे बाल संगोपनासाठी सक्षमीकरण करणे, गाव पातळीवर समाज प्रबोधनाच्या प्रक्रियेतून कुपोषण मुक्तीला चालना देणे, कुपोषण निर्मुलनासाठी लोकसहभाग वाढविणे हे या ग्राम बाल विकास केंद्राचे उद्देश आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. निपाणीकर बी.एच. यांनी दिली.  
यावेळी गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी वाशी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, पर्यवेक्षिका तसेच माता व गावातील नागरीक उपस्थित होते.