उस्मानाबाद,दि.21:- लोकराज्याचा प्रचार आणि
प्रसिध्दी उस्मानाबाद जिल्हयात मोठया प्रमाणात होत आहे." लोकराज्य " मासिकाचे
महत्व उस्मानाबाद मध्ये सर्वत्र सर्वमान्य होऊ लागले आहे. या जिल्हयातील श्री.
बालाजी पवार यांनी पाडोळी येथे मुख्यमंत्री मित्र रेशीम (तुती) उत्पादक शेतकरी गट
सुरू केला. या गटामार्फत शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात
येते. शेतकरी गटातील शेतकऱ्यांची
शेतीविषयक आवड ओळखून श्री. बालाजी पवार यांनी या गटाला "लोकराज्य"
या शासनाच्या मुखपत्र असलेल्या मासिकाची ओळख करून दिली. आणि त्यांनी जिल्हा माहिती
अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याशी संपर्क साधला.
शेतकऱ्यांना श्री. सानप यांनी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती तर दिलीच परंतू शेतीपूरक
व्यवसाय व शेतीविषयक ज्ञान मिळविण्यासाठी माहिती व जनसंर्पकच्या
महान्युजवेबपोर्टल, लोकराज्य तसेच महाराष्ट्र अहेड, दिलखुलास
आकाशवाणीवरील तर जय महाराष्ट्र हा दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा कशाप्रकारे त्यांना
उपयोग होऊ शकेल याची ही सविस्तर माहिती दिली. तसेच आत्तापर्यंत जिल्हयात राज्यातील
पहिले शासकीय कृषी महाविद्यालय, तेर, ता. जि. उस्मानाबाद, राज्यातील पहिले शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,
उस्मानाबाद, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद (लोकराज्य
कार्यालय), जि.प.कें.आदर्श प्रा. शाळा क. तडवळे (लोकराज्य शाळा), विद्यानिकेतन
हायस्कूल, येरमाळा (लोकराज्य शाळा), जय हिंद माध्यमिक विद्यालय क. तडवळे (लोकराज्य
शाळा), महाराष्ट्र संत विद्यालय, तेर (लोकराज्य शाळा), भाई नारायणराव लोमटे, माध्यमिक
विद्यालय,भाटशिरपुरा ता. कळंब (लोकराज्य शाळा), देवधानोरा स्वतंत्र क.
महाविद्यालय, देवधानोरा (लोकराज्य महाविद्यालय), जय हिंद उच्च माध्यमिक विद्यालय
क. तडवळे (लोकराज्य महाविद्यालय) तसेच लोकराज्य दूत म्हणून अण्णासाहेब सातपुते, सिध्दार्थ
सावंत, राहुल जगताप, भारत बळीराम लोंढे, महादेव भंडारे यांना सन्मानित करण्यात आले
आहे, अशी माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
याच प्रेरणेतून आज श्री. बालाजी पवार यांनी श्री. सानप
यांच्याकडे शेतकऱ्यांचा लोकराज्य सभासद नोंदणीकरीता धनादेशही सुपूर्द केला. अशा
प्रकारे उस्मानाबादमधीलच नव्हे तर राज्यातील पहिला लोकराज्य शेतकरी गट बनण्याचा मान
मुख्यमंत्री मित्र रेशीम (तुती) उत्पादक शेतकरी गट पाडोळी यांनी मिळविला आहे. याबद्दल
आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते या गटातील
शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. बालाजी पवार व सहकारी शेतकऱ्यांनी
संकल्प केला की, जिल्हयातील इतर शेतकरी गटांनाही ते लोकराज्यचे सभासद होण्यासाठी
प्रोत्साहीत करतील.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, ॲड.
अनिल काळे, ॲड. नितिन भोसले, अभिलाष लोमटे यांच्यासह उपस्थित सर्वांकडून त्यांचे
अभिनंदन करण्यात आले.
