Monday, 11 September 2017

"महाराष्ट्र वार्षिकी 2017" माहितीपूर्ण संदर्भ ग्रंथ सर्वांसाठीच उपयुक्त--जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे





उस्मानाबाद,दि. 11 :- महाराष्ट्र वार्षिकी 2017 हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आला असून या पुस्तकामध्ये महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राची  सर्वांगीण माहिती वाचनीय स्वरुपात देणारा परिपूर्ण ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अन्य कोणीही सामान्य जिज्ञासू, अभ्यासक, नागरिकांनी जवळ बाळगावा, असा हा ग्रंथ आहे, असे मत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.  

महाराष्ट्र वार्षिकी हा ग्रंथ  नुकताच प्रकाशित झाला आहे. हा ग्रंथ जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना अवलोकनार्थ दिला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र वार्षिकी 2017 या ग्रंथात संपुर्ण राज्याची माहिती जी सर्वस्तरातील लोकांना उपयुक्त आहे. त्यात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भूमी आणि लोक, शासनाचे सर्व विभागांची महत्त्वपूर्ण माहिती,  गत वर्षातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी,  तसेच सर्व जिल्ह्यांची थोडक्यात माहिती आणि महत्त्वाची माहिती या सदरात मंत्रिमंडळ, विधासभा, विधानपरिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्रीमंडळ, महत्त्वाचे निर्णय, योजना आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह हे या पुस्तिकेचे  मुख्य संपादक आहेत.

या पुस्तकाची किंमत 300/- (तीनशे रुपये) असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद येथे हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे.   

महाराष्ट्र वार्षिकी 2017 या पुस्तकामध्ये महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्राची भूमी आणि लोक, राज्याची भौतिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थिती, इतिहास, वन्यजीवन, संस्कृती, महाराष्ट्राविषयी सांख्यिकी स्वरुपाच्या बाबी, पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सांख्यिकी माहिती, वैशिष्ट्ये, शिक्षणसंस्था, सिंचन प्रकल्प, कृषी उद्योग, पर्यटन स्थळे आदी माहितीचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश व कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक व मंत्रिमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम, कार्यक्रम, पुरस्कार, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधिमंडळ सदस्य आणि केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य याबाबतच्या माहितीचाही समावेश आहे.

महाराष्ट्र वार्षिकी 2017 हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शासकीय-निमशासकीय कार्यालये, अभ्यासक, ग्रंथालये, पत्रकार, राजकीय नेते, सामान्यज्ञानाची आवड असणारे सर्व वयोगटातील नागरिक यांना उपयुक्त आहे.