उस्मानाबाद, दि.12:- जिल्हय़ात
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
करण्याकरीता जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात संपन्न झालेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान आढावा बैठकीत बोलत
होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
हनुमंत वडगावे, महिला बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्री.बी.एच.निपाणीकर,
उप विभागीय पोलिस अधिकारी अंजूम शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक
सावंत,शिक्षणाधिकारी (प्रा.)सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (मा) औदुंबर उकिरडे, विधी
सल्लागार श्रीमती.उमा गंगणे, विधी अधिकारी श्रीमती सोनाली पाटील आदीसह बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, जिल्ह्यातील
मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याकरिता स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायद्यांची प्रभावी
अंमलबजावणी करावी. तसेच मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरीता
जनजागृती करावी. स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा, मुलींना शासनामार्फत देण्यात
येणाऱ्या शैक्षणिक व
इतर सवलती याविषयी माहिती देण्यात याव्या. तसेच या अभियानातंर्गत विविध उपक्रम
राबवून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, एकात्मिक बालविकास अधिकारी व वैद्यकिय अधिकारी
यांनी दर महिण्याला आढावा बैठक घ्यावी, बोगस वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरवर
कारवाई करण्याच्या सूचना ही दिल्या.
सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निपाणीकर यांनी
बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाबाबत माहिती
दिली.