Monday, 3 July 2017

स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेला संयुक्त राष्ट्र संघाचा इक्वेटर-2017 पुरस्कार जाहीर


उस्मानाबाद,दि.3: मराठवाडयासारख्या दुष्काळग्रस्त प्रदेशात काम करुन अतिविषम हवामानात योग्य ते कृषीबदल करुन स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेने 20 हजार महिलांना सेंद्रीय शेतीचे कृषी प्रशिक्षण देऊन शाश्वत विकास साधल्याबद्दल संस्थेला यु.एन.डी.पी. चा इक्वेटर पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी 120 देशातील 806 नामांकनामधून जगभरातून केवळ 15 संस्थांची निवड झाली आहे. हा पुरस्कार पटकाविणारी स्वयंम शिक्षण प्रयोग ही देशातील एकमेव संस्था ठरली आहे.
इक्वेटर हा संयुक्त राष्ट्र संघाचा, जागतिक दर्जाचा पुरस्कार आहे. दरवर्षी प्रादेशीक ज्ञानाचा वापर करुन ग्रामविकास करण्यासाठी अद्यावत अभिनव कल्पना विकसित करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा यशस्वी प्रयत्न करणा-या संस्थांना सदर पुरस्कार देण्यात येतो. ज्यामध्ये अन्न  सुरक्षा, जलसंधारण, शाश्वत विकास आणि ग्रामीण उपजीविकेची माध्यमे तसेच आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश होतो.
सप्टेंबर महिन्यामध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसामान्या विधानसभेत स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेला सदर पुरस्कार देण्यात येईल. संस्थेने विकसित केलेले सेंद्रिय शेतीचे कृषीतंत्र केवळ कृषी विकासच नव्हे तर महिलांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा, जलसंधारण, शाश्वत विकास आणि ग्रामीण उपजीविकेची माध्यमे प्रदान करेल असे प्रतिपादन संस्थेच्या कार्यकारी संचालिका, श्रीमती प्रेमा गोपालन यांनी माध्यमांशी बोलताना केले.
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेबद्दल : व्यावसायिकतेला पाठबळ देत ग्रामीण आणि तळागाळातील महिला व युवतींना पुढे येऊन, सक्षम होऊन व्यवसाय कुशल होऊन लोकहिताचे व्यवसाय करण्यास प्रोत्सहान आणि सहाय्य करणे हे संस्थेचे प्राथमिक कार्य आहे. व्यवसाय विकासाचे/वृद्धीचे आणि यशाचे धडे या व्यवसायी महिलांनी एकमेकिंपासुनच घेऊन पुढे गेले पाहिजे यासाठी सदर संस्था व्यासपीठ देखील उपलब्ध करते. भारतातील ग्रामीण महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता विकसित करते. सन 2009 पासून संस्थेने अक्षय उर्जा, शाश्वत शेती, आरोग्य, आहार, स्वच्छता आणि सुरक्षित पाणी यासांरख्या सामाजिक प्रश्नांना उपायात बदलून तळागाळातील 60 हजार महिलांना व्यावसायिक बनवले आहे. 1000 महिलांना अक्षय उर्जा तंत्राचे प्रशिक्षण देऊन व्यावसायिक बनवले आहे.

उपक्रमातील 1 लाखांपेक्षा जास्त महिला त्यांच्या कुटुंबात आता अक्षय उर्जा साधानांचा वापर करतात. स्वयंम शिक्षण प्रयोग, समर्थ महिला व्यवसाय आणि महिलांसोबत समुदायाचा शाश्वत विकास यासाठी गेले 20 वर्षापासून कार्य करीत आहे.  4 लाख लोकांपर्यत पोहोंचत असताना सदर संस्था महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, बिहार, आसाम आणि ओरिसा या राज्यात कार्यरत आहे.