Wednesday, 11 October 2017

जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करावेत -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद,दि.11:-  जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने प्रत्येक विभागाने कामे करताना किंवा नवीन कामे सुरु करताना जिल्हृयातील पर्यटनाला चालना कशी मिळेल यादृष्टीने सुविधा देण्याच्या कामाला प्राधान्य दयावे, अशा सुचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज आयोजित बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘पर्यटन पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निलेश श्रींगी,  श्रीमती. डॉ. देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश आघाव यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. गमे यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने जिल्ह्यात असलेली पर्यटन स्थळ कसे विकसित करता येतील यासाठी प्रत्येक विभागाने लक्ष देवून  नवीन सुविधा काय करता येते यासाठी  प्राधान्य दयावे.
        यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.आडे यांनी जिल्ह्यातील 22 पर्यटन स्थळाची संगणकीय प्रणालीद्वारे माहिती सादर केली. तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे श्री. रामदास क्षिरसागर, श्री. प्रशांत टोपे, श्री. स्वप्नील चके यांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ, ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक स्थळे, अदभुत महाराष्ट्र व पर्यटनाच्या संधी याबाबत संगणकीय प्रणालीद्वारे सादरीकरण केले.