Wednesday, 11 October 2017

उस्मानाबादमध्ये पार पडला शासकीय खरेदी “ई वाटचालीचा” साक्षरता वर्ग





उस्मानाबाद, दि. 11 :-  यशदा, मराठवाडा विकास प्रबोधिनी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे एक दिवसीय शासकीय खरेदी प्रक्रिया व “ई टेंडरिंग" चे  प्रशिक्षण पार पडले.   
        या प्रशिक्षण वर्गास उद्घाटक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, चेतन गिरासे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कलीम शेख, मराठवाडा विकास प्रबोधिनीच्या सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती चौंडेकर आणि यशदाचे मास्टर ट्रेनर श्री. डी. वाय. मुरुमकर हे उपस्थित होते.
        उद्घाटनप्रसंगी श्री. पाठक यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की, शासनाच्या पारदर्शक कारभारासाठी ई प्रक्रियाही एक अविभाज्य घटक बनलेली आहे. यासाठी नियमित प्रचलित आर्थिक नियमांचा अभ्यास करुन प्रत्येक विभागाने ई-टेंडर, ई-ऑक्शन आणि ई-मार्केटिंग या बाबींना लवकरात लवकर आत्मसात करणे आवश्यक आहे.
        प्रास्ताविकात श्री. शेख यांनी या प्रशिक्षण संस्थेविषयीची माहिती उपस्थितांना सांगितली आणि श्रीमती चौंडेकर यांनी या प्रशिक्षणाच्या आयोजनाचा हेतू विशद केला.
        त्यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, वित्त व लेखा श्री. डी.वाय. मुरुमकर यांनी संगणकीय सादरीकरणातून उपस्थितांना सविस्तरपणे “खरेदी प्रक्रिया व ई-टेंडर” या विषयावरील प्रशिक्षण दिले.
        यावेळी जिल्हयातील सर्व विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाकरिता जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी विशेष पुढाकार घेतला आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शेख, सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती चौंडेकर तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
x