Sunday, 14 August 2016

उस्मानाबाद पोलिसांच्या सायबर लॅबचे स्वातंत्र्यदिनी होणार उद्घाटन


उस्मानाबाद,दि.14:-सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांचा तपास गतीमान पद्धतीने करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यात एकाचवेळी 44 सायबर फॉरेन्सीक लॅब सुरु करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या या अत्याधुनिक लॅबचे लॅबचे उद्घाटन सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी या सायबर लॅब सूसज्ज करण्यात आल्या आहेत. उस्मानाबादमधील ही सायबर लॅब मुंबई मुख्यालयाशी जोडण्यात आलेली असून त्याद्वारे 24 तास सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवता येणार आहे. मिळालेल्‌या माहितीच्या आधारे इंटरनेटशी संबंधित गुन्हे उदा. आर्थिक गुन्हे, ऑनलाईन बँक गुन्हे, सोशल मिडियावरील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता तसेच सायबर गुन्ह्यांचा जलद व गतीमान तपास करण्याकरीता त्यांचा वापर करता येणार आहे. या लॅबमुळे उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलही आणखी सक्षम आणि अत्याधुनिक होणार आहे.