उस्मानाबाद,दि.13:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया महामित्र उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील निवडक सहभागींनी आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात संवादसत्र स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या गटचर्चेत उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर व उमरगा या क्षेत्रातील एकूण 19 युवकांनी सहभाग नोंदविला होता.
जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी सोशल मीडिया महामित्र उपक्रम आणि संवादसत्र उपक्रमाबद्दल प्रास्ताविकातून उपस्थित स्पर्धक, परीक्षक, निरीक्षक यांना माहिती सांगितली.
दिवसभरात एकूण चार टप्प्यातील स्पर्धकांनी महामित्र उपक्रमातून काय साध्य होईल? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांचा प्रभाव किती खरा किती खोटा? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांची इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बरोबरी? अशा विषयांवर गटचर्चा होवून ही स्पर्धा संपन्न झाली.
या गटचर्चांचे परीक्षण व निरीक्षण जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, पत्रकार संतोष जाधव, साहित्यिक राजेंद्र अत्रे,नेहरू विकास केंद्राचे विकास कुलकर्णी,संतोष कांबळे (कोळी), गणेश कुलकर्णी यांनी केले.
शेवटी सहभागी सर्व स्पर्धकांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अभिनंदन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.याशिवाय सहभागी स्पर्धकांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली तसेच त्यांना लोकराज्य, महाराष्ट्र अहेड, मुद्रा योजनेची आणि बळीराजा चेतना अभियानाची माहिती पुस्तिका भेट स्वरुपात देण्यात आले.