उस्मानाबाद,दि.24:- जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासन आणि जनता यांनी
मिळून जलसंधारणाची उल्लेखनीय
कामगिरी केली, त्याचा या पावसाळ्यात
आपल्या सर्वांना चांगला प्रत्ययही आला.
आता जिल्ह्यात पाण्याचा मुबलक साठा निर्माण
झाला असून पाण्याच्या वापराबाबतचे योग्या ते नियोजन
करणे ही सर्वांचीच सामाजिक जबाबदारी
आहे . त्याकरिता संबंधित गावपातळीपासून ते जिल्हास्तरीय सर्व अधिकारी , स्थानिक स्वराज्य
संस्थांचे प्रतिनिधी असे सर्वांनीच
मिळून प्रत्येक गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा , असे जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे सूचित केले .
पाणी आरक्षण , पाणी नियोजन
याबाबत अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी
ते बोलत होते . यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
आनंद रायते , निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव ,
जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे उपस्थित होते .
जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तलाठी व ग्रामसेवकांची बैठक घ्यावी
व संभाव्य पाणी टंचाई असणारी गावे यांचा आढावा
घ्यावा , प्रकल्पात पाणी आहे परंतु विदयुत पुरवठा नसेल तर त्याबाबत आढावा घेण्यात यावा , पाणी वितरणाबाबत शाश्वत आराखडा तयार करण्यात यावा
, शासकीय टँकरची स्थिती कळवावी, प्रत्येक गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा
तयार करुन आहे त्या पाण्याचा येणाऱ्या
मार्च ते जुलै या कालावधीपर्यत विनियोग करावा , दि.30 नोव्हेंबर पूर्वी जिल्हा कृषी
अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
करुन जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा , जलयुक्त शिवार योजनेतून किती
पाणी उपलब्ध झाले याचा अहवाल सादर करणे इत्यादी सूचना सर्व संबंधितांना यावेळी जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
या बैठकीस
सर्व तहसिलदार , सर्व गट विकास अधिकारी , जिल्हा
परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.देवकर , जलसंधारण विभागाचे अधिकारी
आदी यावेळी उपस्थित होते .