Thursday, 22 January 2026
िंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जळकोट येथील कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जळकोट येथील कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
धाराशिव दि.२१ जानेवारी (जिमाका) “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, जळकोट ता.तुळजापूर येथे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण,अभिव्यक्ती कौशल्य आणि राष्ट्र व मानवतावादी मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता.
या वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.एम.चव्हाण यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.एस.एन.दूधभाते उपस्थित होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
वक्तृत्व स्पर्धेत एकूण चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या जीवनकार्यावर प्रभावीपणे विचार मांडले.धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान,अन्याय व अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, सर्व धर्मांप्रती समानतेची भावना आणि मानवतेसाठी केलेला त्याग यावर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून प्रकाश टाकला.गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.यावेळी नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य शहीदी समागम कार्यक्रमाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
नांदेड येथील हा कार्यक्रम श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त देशभरात चालू असलेल्या स्मरणोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असून,त्यांच्या विचारांचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे.अशा कार्यक्रमांमुळे तरुण पिढीला इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांची ओळख होऊन समाजात सहिष्णुता, एकात्मता व मानवता वृद्धिंगत होते, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री.एस.एम.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या जीवनातून धैर्य,सत्यनिष्ठा व त्यागाची प्रेरणा घ्यावी,असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे श्री.एस.एन.दूधभाते यांनीही वक्तृत्व स्पर्धांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते,असे सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली असून, महाविद्यालयीन जीवनात अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
*****
