उस्मानाबाद दि.14:- राष्ट्रीय
अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि.12 ते 18 मार्च 2017 दरम्यान जागतिक काचबिंदू
सप्ताह साजरा करण्यात येते असून दि.14 मार्च 2017 रोजी बाहयरुग्ण विभाग जिल्हा
रुग्णालय, उस्मानाबाद येथे काचबिंदू सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रुग्णलयाचे अतिरिक्त जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील हे होते. नेत्रविभाचे नेत्रशल्यचिकित्सक डॉ.
एम.के.पल्ला, डॉ. ज्योती कानडे, डॉ. विजय साबळे, अधिसेविका श्रीमती सरस्वती थोरात यांची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक
करताना जिल्हा रुग्णलयातील वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय साबळे यांनी डोळयांना होणारे
विविध आजार व काचबिंदू यातील फरक समजावून सांगितला . त्यामुळे काचबिंदू झाल्यानंतर
त्याचे निदान कशाप्रकारे करता येते याबाबतही डॉ. साबळे यांनी माहिती दिली.
नेत्र शल्यचिकित्सक डॉ.ज्योती
कानडे यांनी उपस्थित सर्वांना काचबिंदू म्हणजे काय, काचबिंदू होण्याचे कारण,
काचबिंदू होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, काचबिंदूचे समाजात वाढत चाललेले प्रमाण
तसेच वय वर्षे 40 नंतर प्रत्येक व्यक्तीने व ज्या व्यक्तीला मधुमेह हा आजार आहे
अशा व्यक्तींना किमान सहा महिन्यातून एकदा तज्ञ डॉक्टरांमार्फत डोळयांची तपासणी
करुन घ्यावी जेणेकरुन काचबिंदूचे लवकर निदान करुन त्यावर योग्य उपचार केल्यामुळे
काचबिंदूमुळे येणारे अंधत्व नियंत्रणात ठेवता येऊ शकते याबाबत सखोल मार्गदर्शन
केले. दर शुक्रवारी नेत्रचिकित्सा बाहय रुग्ण विभागामध्ये काचबिंदूची तपासणी
करण्यात येणार असल्याचेही डॉ. कानडे यांनी यावेळी सांगितले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. धनजंय पाटील यांनी उपस्थितांना
सांगितले की, डोळा हा शरीरातील महत्वाचा भाग असून त्यामध्ये काचबिंदू व इतर डोळयांच्या
आजारासंदर्भात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेऊन वेळेत उपचार करुन घ्यावेत, असे
आवाहन केले.