Saturday, 18 March 2017

लेख - दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग आणि त्यावरील उपाय

                                                                                                                  

        आपल्याला कल्पना असेलच की साथीचे आजार आणि पाणी यांचे अतिशय निकटचे नाते आहे.साथीच्या रोगांना दूषित पाण्यापासून होणारे रोग म्हटल्यास फारसे वावगे होणार नाही.  पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे.किंबहुना मनुष्यास पाण्याशिवाय जगणे कठीण आहे.मानव शरीरास आवश्यक असणारा घटक जर विविध आजाराच्या अति सूक्ष्म जीवाणू अथवा विषाणूंनी दूषित झाला तर कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर, अतिसार, पोलिओ, मलेरिया इत्यादी सारख्या प्राणघातक आजाराची मोठ्या प्रमाणात लागण होऊन एकाच वेळी अनेकांचे प्राण जाऊ शकतात या प्रमुख साथीच्या रोगाची थोडक्यात माहिती.

कॉलरा :- हा रोग सूक्ष्म जीवाणूपासून होणारा रोग आहे.या रोगाचा प्रसार प्रामुख्याने दूषित पाणी, अन्न व माशा याद्वारे होतो यात रुगाला सतत जुलाब व उलट्या होतात.जुलाबाचा रंग भातावरील फऱ्याच्या रंगासारखा असतो.रुग्णाला ताप येतो.शरीरातील क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण उलट्याने डोळे खेल जातात.अशक्तपणा जाणवतो व रुग्णाला लघवी होत नाही.अशी लक्षणे दिसताच रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात यावे.तत्पूर्वी त्याला साखर, मीठ व पाणी यांचे एकत्रित केलेले मिश्रण म्हणजेच जलसंजीवनी सतत पाजावे.अशा रुग्णाची उलटी व संडास यावर बसलेल्या माशा, दूषित झालेले अन्न पदार्थ इतरांच्या पोटात गेल्यास तोही या रोगास बळी पडतो.म्हणून अशा रुग्णाची उलटी व संडास ताबडतोब झाकून अथवा पुरुन टाकावी.

गॅस्ट्रो इंटरायटीस:- या रोगाची लक्षणे जवळपास कॉलरा रोगासारखीच आहेत.मात्र याचे जीवाणू वेगळे असल्याने कॉलराप्रमाणे संडास उलटी झपाट्याने होत नाही.यासाठी कॉलरा प्रमाणे औषध उपचार करण्यात यावा.

कावीळ:- हा रोग या रोगाच्या विषाणूनी दुषित झलेल्या पाण्यापासून उद्भवतो.या रोगाचे विषणू मुख्यत: विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यात आढळतात.या रोगाची प्रमुख लक्षणे - भूक न लागणे, पाण्यात आढळतात.या रोगाची प्रमुख लक्षणे - भूक न लागणे, अशक्तपणा जाणवतो,  डोळे पिवळसर होणे, कातडीचा रंग पिवळसर होणे, उजव्या बाजूच्या बडगडीखाली असलेल्या यकृतावर सुज येणे ही आहेत.अशी लक्षणे जाणवताच रोग्याला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला द्यावा.ग्लुकोज साखरयुक्त थंडपाणी सतत द्यावे.विषाणूंनी दूषित झालेल्या सार्वजनिक पाणी तात्काळ निर्जंतुक करण्याची व्यवस्था करावी.अन्यथा हा रोग झपाट्याने साथीच्या स्वरुपात गावात पसरण्याची शक्यता असते.

विषमज्वर (टायफाईड):- हा रोग दुषित पाण्यामुळे व दूषित अन्न पदार्थामुळे होतो.यात जिवाणूंचा परिणाम लहान आतड्यांवर होतो.  त्यावर सूज येणे.त्यामुळे रुग्णास अस्वस्थता वाटू लागते.अंगात तापाचे प्रमाण खुप असते.पूर्वी या रोगावर उपाय नव्हता भाग आता यावर क्लोरोमायसीटीन सहित इतर अनेक ऍ़न्टीबायोटीक्स उपलब्ध झालेली आहेत.विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर निश्चित मात करता येते.

पोलिओ:- हा रोग या रोगाच्या विषाणूपासून दूषित झालेले पाणी, तसेच अन्न पदार्थ याद्वारे होतो.या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात 0 ते 6 वर्ष वयोगटात आढळून येतो.रुग्णास ताप येणे.पातळ संडास होणे, अशक्तपणा जाणवते, हात पाय दुखने इत्यादी या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत.या रोगाचे जंतू पोटातून मेंदूपर्यंत पोहचतात व तेथून मज्जातंतूवर त्याचा परिणाम होऊन हात पाय लुळा पडणे, हातापायाची शक्ती कमी होणे अशा प्रकारची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात.  याचवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अपंगत्व येणे टाळता येणे.यात शारिरीक स्वच्छता व इतर मुळापासून रोगपिडीत मुलास दूर ठेवणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.यात प्रतिबंधक इलाज म्हणून 0 ते 5 वर्ष वयात पोलिओची लस नियमाप्रमाणे पाजून घ्यावी.

अतिसार:- हा रोग सूक्ष्म जंतूंपासून होतो.अमीबा सारखे अतिसूक्ष्म जीवाणू दूषित पाण्यातून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि तेथे यांची वाढ होते.यापासून पचनक्रियेचे आजार व अतिसार हागवण या सारखे रोग निर्माण होतात.यात जंतूचा प्रवास रुग्णाच्या विष्टेपासून माशाद्वारे अन्न पदार्थ दूषित होऊन मानवी शरीरात होतो.व्यक्ती शारिरीक अस्वच्छता उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे व अशुद्ध पाणी पिण्यामुळे हा आजार होतो.शुद्ध निर्जंतूक पाणी पिण्यास वापरणे हा यातील अत्यंत महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.

मलेरिया:- हा रोग काही विशिष्ट प्रकारच्या जातीच्या डासापासून होतो.  घराच्या परिसरात साचलेल्या घाण पाण्यावर डास अंडी घालतात व त्यापासून डासाची भरमसाठ उत्पत्ती होते.हिवताप झालेल्या रुग्णांना हा डास चावतो व रुग्णाच्या शरिरातील हिवतापाचे रोगजंतू डासाच्या शरीरात जातात.डासाच्या शरीरात हिवतापाच्या रोगजंतूचे जीवनचक्र पूर्ण होते.हिवतापाने आजारी झालेला डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीस हिवतापाचा प्रादूर्भाव होतो.म्हणून घराभोवतालच्या सांडपाण्याचा योग्य वापर करण्यासाठी परसबाग करणे अथवा शोषखड्डा करणे, त्यावर उपाय आहे.डासाची वाढ थांबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केल्या जाणाऱ्या किटकनाशक फवारणीला सहकार्य करावे जेणे करुन डासाचा नाश होईल व त्याची उत्पत्ती थांबेल.

          साथीच्या काळात रोगावर करावयाच्या प्रथमोपचार व ग्रामस्थांनी ग्रामस्तरावर करावयाची कार्यवाही पुढीलप्रमाणे करावी.गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी, सदस्य किंवा इतर कोणत्याही ग्रामस्थांनी साथीच्या रोगाची माहिती होताच तात्काळ संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, उपकेंद्र आरोग्य कर्मचारी यांना कळवावी.गंभीर अवस्थेतील रुग्णास विनाविलंब जवळच्या रुग्णालयात औषध उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था करावी जेणे करुन संभावित रुग्ण मृत्यू होणार नाही.तीव्र जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यास प्रथमोपचार म्हणून चिमूटभर मीठ, मूठभर साखर व एक लिटर पाण्याचे केलेले मिश्रण रुग्णास सतत पाजण्यास सल्ला द्यावा.जेणे करुन रुग्णास वैद्यकीय मदत मिळेपर्यंत मृत्यू होणार नाही.गावातील दूषित झालेला पाणीपुरवठा ब्लीचींग पावडरने निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरु करावी.वैद्यकीय मदत पथक गावात आल्यानंतर औषधोपचारासाठी लागणारी जागा उपलब्ध करणे व त्यांना थांबण्याची सोय करणे.साथीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती पुरविणे असे सहकार्य करावे.साथरोग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी वैद्यकीय मदत पथकास आवश्यक ते सहकार्य करावे.
    
                                                                           (मनोज शिवाजी सानप)
                                                                               जिल्हा माहिती अधिकारी,

                                                                                 उस्मानाबाद.