Tuesday, 14 March 2017

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता दिनांक 21 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन


उस्मानाबाद.दि.14:-दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी  जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या असून दिनांक 21 मार्च रोजी  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी 2.00 वाजता विशेष  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .
यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष  यांच्या निवडीसाठी  जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील .
या बैठकीची रुपरेषा पुढीलप्रमाणे राहील- दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी 2.00 वाजता सभेस सुरुवात करणे, दुपारी 2.00 ते 2.15 पर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी  प्राप्त  नामनिर्देशन पत्राची तपासणी करणे व  नामनिर्देशन पत्राची छाननी करणे,  दुपारी 2.15 वाजता  वैधरित्या  नामनिर्दिष्ट  उमेदवारांची नावे वाचून दाखविणे,दुपारी 2.15 ते 2.30 पर्यंत  उमेदवारी परत घेणे , दुपारी 2.35 वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे,दुपारी 2.40 वाजता  निवडणूक लढविणाऱ्या  उमेदवारांची नावे वाचून दाखविणे, दुपारी 2.40 ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी आणि निवडणुकीचा निकाल जाहीर करणे.

वरील  कार्यक्रमानुसार प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल व त्यानंतर त्याच पध्दतीचा अवलंब करुन  उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येईल , असे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .