Thursday, 30 July 2026

हरित धाराशिव अभियान २.० मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाचे आवाहन एकाच दिवसात १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा विक्रम करण्याचा संकल्प ; पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

हरित धाराशिव अभियान २.० मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाचे आवाहन एकाच दिवसात १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा विक्रम करण्याचा संकल्प ; पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार धाराशिव दि.३० जुलै (जिमाका) पर्यावरण संवर्धन,हवामान बदलाच्या परिणामांवर प्रभावी उपाययोजना आणि हरित धाराशिव घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन व उत्स्फूर्त लोकसहभागातून सन २०२६ च्या पावसाळ्यात हरित धाराशिव अभियान २.० हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानातून पर्यावरण संरक्षणासह भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत एकाच दिवशी अवघ्या १२ तासांत घनवन (Miyawaki) पद्धतीने किमान १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून Guinness World Records मध्ये नव्या विक्रमाची नोंद करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.मात्र हा उपक्रम केवळ विक्रम नोंदविण्यापुरता मर्यादित नसून, जिल्ह्याचे हरित क्षेत्र वाढविणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे, भूजल पातळी सुधारण्यास हातभार लावणे,कार्बन शोषण क्षमता वाढविणे आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणपूरक वारसा निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख हेतू आहे. निसर्गाशी मैत्री जपणाऱ्या या ऐतिहासिक अभियानात जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था (NGOs), सामाजिक संस्था, युवक मंडळे,पर्यावरणप्रेमी संघटना, CSR अंतर्गत कार्य करणाऱ्या संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. अभियानांतर्गत एकाच दिवशी १२ तासांत घनवन (Miyawaki) पद्धतीने वृक्षलागवड करण्यात येणाऱ्या क्षेत्रांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्थळांची संख्या ४, लागवडीचे क्षेत्र (हे.) १४.५ हेक्टरवर वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या ४ लक्ष ३५ हजार,वनीकरण विभाग,प्रादेशिक,धाराशिव स्थळांची संख्या ४,लागवडीचे क्षेत्र (हे.) १४.५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या ४ लक्ष २६ हजार, येडेशी अभयारण्य वन्यजीव, येडशी - स्थळांची संख्या १,लागवडीचे क्षेत्र (हे.) ५ हेक्टर, वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या- १५ हजार अशी एकूण स्थळांची संख्या ८, लागवडीचे क्षेत्र (हे.) ३३.७ हेक्टरवर वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या १० लक्ष ११ हजार अशी राहणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित भविष्याच्या उभारणीसाठी जिल्ह्यातील नागरिक,युवक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.वृक्षलागवड ही केवळ एक मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ हवा,समृद्ध जैवविविधता आणि सुरक्षित पर्यावरण देण्याची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना या अभियानातून अधोरेखित होत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी,असेही प्रशासनाने कळविले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची ताकद एकवटत धाराशिव जिल्हा हरित विकासाचा नवा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे या अभियानातून स्पष्ट होत आहे. **