Friday, 31 July 2026

पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध उपक्रम ; विद्यार्थी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध उपक्रम ; विद्यार्थी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन धाराशिव,दि.३१ जुलै (जिमाका) महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य,पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय नव्या पिढीला व्हावा,या उद्देशाने यंदा १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध,वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पराक्रम दिनाच्या आयोजनासाठी अमृत संस्थेमार्फत ‘पराक्रम दिन समिती’ स्थापन करण्यात आली असून,त्यामध्ये इतिहास अभ्यासक व तज्ज्ञ काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे,जगन्नाथ लडकत,मोहन शेटे,मंगेश खाडिलकर आणि सौ.कौमुदी परांजपे यांचा समावेश आहे.या निमित्ताने शाळा,महाविद्यालये तसेच खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून,जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. निबंध स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट) निबंध स्पर्धेसाठी शालेय, महाविद्यालयीन आणि खुला असे तीन गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी कमाल १,००० शब्दांपर्यंतचा निबंध मराठी,हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाइप करून पीडीएफ स्वरूपात अपलोड करावा.निबंधासाठी आवश्यक संदर्भ अमृत पराक्रम दिनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील लिंक, संदर्भ पुस्तके आणि माहिती पुस्तिकेवर आधारित असावेत. बक्षीसपात्र निबंधांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. वक्तृत्व स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट) वक्तृत्व स्पर्धेतही शालेय, महाविद्यालयीन आणि खुला असे तीन गट आहेत. स्पर्धकांनी स्वतःच्या आवाजातील जास्तीत जास्त सात मिनिटांचा मूळ व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे.व्हिडिओ स्पष्ट आवाजातील, उत्तम दर्जाचा आणि पूर्णपणे ओरिजिनल असावा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिज्युअल इफेक्ट्स,साऊंड इफेक्ट्स,एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) जनरेटेड प्रतिमा किंवा तत्सम साधनांचा वापर करता येणार नाही. विषयासाठी आवश्यक संदर्भ अमृत पराक्रम दिनाच्या संकेतस्थळावरील अधिकृत साहित्यावर आधारित असावेत.नियमांचे पालन करून तयार केलेला व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करावा. बक्षीसपात्र व्हिडिओबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. रिल्स स्पर्धा (महाविद्यालयीन व खुला गट) रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर २ ते ३ मिनिटांची रिल्स किंवा शॉर्ट्स तयार करावीत. चित्रीकरणासाठी विषयाला अनुरूप ठिकाण,स्पष्ट व्हिडिओ आणि उत्तम ध्वनी गुणवत्ता असणे आवश्यक आहे.रिल्स स्वतःच्या आवाजात आणि स्वतःवर चित्रित केलेली असावी.मूळ विषयाच्या संदर्भानुसार आवश्यक असलेल्या प्रतिमा, ध्वनी किंवा एआयचा वापर करून मिक्सिंग करण्यास परवानगी असेल. सहभागाची मुदत व संकेतस्थळ स्पर्धांसाठी प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी १ ते १५ ऑगस्ट २०२६ असा आहे.स्पर्धेचे स्वरूप,विषय,बक्षिसे,नियमावली तसेच सहभाग नोंदणीची सविस्तर माहिती पराक्रम दिनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संदर्भ पुस्तके व ई-बुकची सुविधा थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित शेकडो पुस्तके उपलब्ध असली तरी या स्पर्धांसाठी आवश्यक असलेली निवडक संदर्भ पुस्तके पराक्रम दिन समितीने निश्चित केली असून त्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.तसेच थोरले बाजीराव पेशवे यांचा जीवनप्रवास सोप्या आणि संक्षिप्त स्वरूपात ई-बुकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याच आधारे प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. स्पर्धांसाठी समान विषय निबंध,वक्तृत्व आणि रिल्स या तिन्ही स्पर्धांसाठी पुढील विषय समान असतील : ‘१८व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे’, ‘अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे’,‘थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य’, ‘थोरल्या बाजीरावांची युद्धनीती’, ‘थोरल्या बाजीरावांची स्वामीनिष्ठा’,‘थोरल्या बाजीरावांची दिल्ली मोहीम’,‘बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते थोरले बाजीराव पेशवे’ आणि ‘थोरल्या बाजीरावांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय’.सर्व शाळा,महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या राज्यस्तरीय उपक्रमात उत्साहाने सहभागी होऊन थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्यपर परंपरेचा गौरव करण्याचे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. *****