Friday, 31 July 2026

‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात विद्यालय-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात विद्यालय-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव,दि.३१ जुलै (जिमाका) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @२०४७’ या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेला साकार करण्यासाठी युवकांना व्यसनमुक्त, सुदृढ,सक्षम आणि राष्ट्राभिमानी बनविण्याच्या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारअंतर्गत ‘मेरा युवा भारत (MY Bharat)’ मार्फत देशभर ‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ हे राष्ट्रीय अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत मेरा युवा भारत,धाराशिव आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,दि.३० जुलै रोजी टीआयएसएस तुळजापूर कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन टीआयएसएस तुळजापूर कॅम्पसचे संचालक प्रा. बाळ राक्षसे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी युवकांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की,देशाच्या इतिहासात क्रांतिकारी आणि विकासात्मक कार्य करणाऱ्या अनेक महापुरुषांनी आपल्या तारुण्यातच समाजाला दिशा दिली.स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी युवा शक्तीच्या बळावर राष्ट्रनिर्मितीचे कार्य घडविले.त्यामुळे आजच्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्राच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा.व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित युवा शक्ती हीच विकसित भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. प्रास्ताविकात मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री.करंजकर यांनी ‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली.व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग,सामाजिक जनजागृती आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले. टीआयएसएस तुळजापूरचे वरिष्ठ सहाय्यक प्रा.तथा विद्यार्थी व्यवहार विभागाचे अध्यक्ष डॉ.संपत काळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैली,मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले.शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारी युवा पिढीच समाजपरिवर्तन घडवू शकते,असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रम समन्वयक गणेश चादरे यांनी आपल्या मनोगतात ‘युवा’ या शब्दाची आगळीवेगळी व्याख्या मांडली.‘युवा’ हा शब्द उलटा वाचला तर ‘वायु’ होतो.वायु जसा जीवनदायीही असतो आणि युवकांच्या शक्तीला विधायक दिशा देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये संगीत (लोकगीत),नृत्य,पथनाट्य/मूकनाट्य,चित्रकला,वादविवाद, लघुपट/रील,घोषवाक्य लेखन आणि स्लॅम पोएट्री या आठ प्रकारांचा समावेश होता.सर्व स्पर्धांमधून विविध कला माध्यमांच्या साहाय्याने व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेंद्र आर्य विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य जयराज सूर्यवंशी तसेच श्रीमती.ललिता पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश चादरे, सतीश वड,वैभव लांडगे,रवी सुरवसे,प्रवीण माने,शंकर ठाकरे, डॉ.जेसिका घाटोडे,डॉ.अश्विनी पांढरे,जान्हवी पांढरे आणि श्री. नितीश कुमार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार सतीश वड,समुपदेशक तथा कार्यक्रम समन्वयक यांनी मानले.व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेला युवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत विविध सांस्कृतिक माध्यमांतून प्रभावी संदेश दिल्याने या जिल्हास्तरीय स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. *******