Monday, 27 July 2026

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन धाराशिव,दि.२७ जुलै (जिमाका) जिल्ह्यातील विविध क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प धाराशिव जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आला असून, जिल्ह्याच्या विकासाचे स्पष्ट व्हिजन ठेवून काम करणारी धाराशिव जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णयही या व्हिजनमध्ये प्रतिबिंबित होतो.शासनाच्या प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या,तर गावे निश्चितच समृद्ध होतील,असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. जिल्हा परिषद धाराशिवच्या ‘आपला जीव – धाराशिव व्हिजन २०३०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन आज सोमवारी २७ जुलै रोजी जि.प.कन्या प्रशाला मैदान येथे झाले.त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.गोरे बोलत होते. यावेळी मंचावर मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,आमदार विक्रम काळे,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती.उषा गायकवाड,जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती सिद्धेश्वर कोरे,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती भाऊसाहेब खरसडे, समाजकल्याण समिती सभापती विश्वास कोकणे,महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती पूजा शिंदे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ध्यक्षा अस्मिता कांबळे व नेताजी पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी तसेच माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.गोरे म्हणाले,प्रत्येक जिल्ह्याने विकासाचा ठोस संकल्प केला,तर महाराष्ट्र अधिक वेगाने प्रगती करेल.धाराशिव जिल्हा परिषद व्हिजन ठेवून पुढे जात असून, हे व्हिजन २०३० पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार आहे.नवीन पिढीनेही या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन काम केले पाहिजे.जिल्हा परिषदेने ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषय या व्हिजनमध्ये समाविष्ट केले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागाचे चित्र निश्चितच बदलेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले,उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांतील महिलांना सक्षम करण्यात येत आहे.राज्यातील ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून, एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे.जिल्हा परिषदेची विद्यमान इमारत १९९० मध्ये बांधण्यात आली असून,ती आता अपुरी पडत आहे. काही विभागांना आवश्यक जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,धाराशिव जिल्हा परिषदने विकासाचे स्पष्ट उद्दिष्ट निश्चित केले आहे.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी,पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांची जबाबदारी वाढली असून, तन-मन-धनाने विकासासाठी कार्य करावे लागेल. या व्हिजनमुळे जिल्ह्याच्या कायापालटाची प्रक्रिया सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत आहे.जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करण्याची गरज आहे.नवीन जिल्हा परिषद इमारतीसाठी पीपीपी मॉडेलचा अवलंब करण्याची आवश्यकता असून, जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून महिलांना सक्षम केले जात असून, येत्या काळात सुमारे ३५०० महिलांना स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार विक्रम काळे म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणारी धाराशिव जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीला ३५ वर्षे पूर्ण झाली असून,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नवीन इमारतीची मागणी मंजूर करावी. तसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना मोबाईल व इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदने घेतल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले,धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असून,पाच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती करून आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर पडण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे.दर्जेदार आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास यांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अर्चना पाटील म्हणाल्या,सन २०३० पर्यंत धाराशिव जिल्हा परिषद विकासाच्या दृष्टीने आदर्श बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ या उपक्रमामुळे जिल्ह्याचे चित्र बदलणार असून,या उपक्रमाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त करत काही मागण्याही त्यांनी मांडल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या रामकृष्ण माळी, प्रकाश गोडसे आणि नरहरी भागेकर यांना आधार प्रमाणीकरण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.तसेच नीट परीक्षेत यश संपादन करणारा जि.प.कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक पाटील याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्षा.श्रीमती अर्चना पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य,पंचायत समित्यांचे सभापती,उपसभापती,सदस्य, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, बचत गटांतील महिला,पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार तसेच विविध विभागप्रमुखांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे आणि ऐश्वर्या हिवारे यांनी केले,तर आभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. *****