उस्मानाबाद, दि. 22:
श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे मंगळवारी जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रसारमाध्यमांच्या व्हॉटसप ग्रुपवर बातमी व फोटो
पाठवून मिडीया कक्षाचे उदघाटन करण्यात आले. श्रीतुळजाभवानी मंदिरातील सर्व विधी व
कार्यक्रमाचे प्रसारण तात्काळ करता यावे, याकरीता अद्ययावत सुविधांसह मिडीया
कक्षाची स्थापना करण्यात आली असून वेळोवेळी पत्रकारांना मंदिरातील कार्यक्रम व
विधीची माहिती कक्षाद्वारे पुरविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.
गमे यांनी हा नवरात्र महोत्सव आपल्या उस्मानाबादचीच नव्हे तर संपूर्ण राज्याची शान
आहे, म्हणून प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या महोत्सवाला अधिकाधिक सकारात्मक
प्रसिध्दी देऊन सहकार्य करावे, जर व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आढळल्या तर अगदी
हक्काने त्या त्रुटी मला निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन उपस्थित प्रसारमाध्यम
प्रतिनिधींना केले.
या कार्यक्रमास दूरदर्शनचे
कार्यक्रम निर्माता मलकराज पंचभाई, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंदिर
संस्थानचे तहसीलदार सुनिल पवार, नगरपालिका प्रशासन अधिकारी बाबासाहेब मनोहरे
यांच्यासह मोठया संख्येने पत्रकार बांधवांची तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील
कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मीडीया कक्षाचे
महत्व व त्याची उपयोगिता उपस्थितांना प्रस्तावनेतून सांगितली व शेवटी सर्व उपस्थित
प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे आभार मानले.
