उस्मानाबाद,दि.23:- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र
महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची
आज तिसरी माळ.
शनिवारी पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत
देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी
देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. श्री तुळजाभवानी
देवीची विविध अलंकार पूजेस दि. 24 पासून सुरुवात होणार आहे. यात, दि.24 रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 25 रोजी मुरली
अलंकार महापूजा, दि.26 रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि.27 रोजी भवानी तलवार
अलंकार महापूजा आणि दि.28 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
तत्पूर्वी, काल (शुक्रवारी) रात्री
10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
भाविकांना
आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी
मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा घेत आहेत.