Friday, 10 April 2026

हँड्स ऑन ट्रेनिंग’मुळे खरीपासाठी सज्ज कृषी यंत्रणा नैसर्गिक शेतीवर तज्ज्ञांचा भर विशेष खरीप कार्यशाळा

हँड्स ऑन ट्रेनिंग’मुळे खरीपासाठी सज्ज कृषी यंत्रणा नैसर्गिक शेतीवर तज्ज्ञांचा भर विशेष खरीप कार्यशाळा धाराशिव दि.१० एप्रिल (जिमाका) खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.आज,१० एप्रिल २०२६ रोजी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव आणि कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष खरीप कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यशाळेत बीजप्रक्रिया,बियाणे उगवण क्षमता तपासणी,एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेती या विषयांवर क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय कृषी अधिकारी श्री. महादेव आसलकर यांनी प्रास्ताविक करत खरीप हंगामाचे नियोजन आणि कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ (Hands-on Training) वर विशेष भर देताना त्यांनी सांगितले की,केवळ तात्विक माहिती न घेता प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण घेतल्यास अधिकारी ते ज्ञान अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतात. तांत्रिक सत्रात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ श्रीमती.कसबे आणि श्री. झगडे यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये बीजप्रक्रिया,बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी याबाबत माहिती देत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) अंतर्गत पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवत उत्पादकता वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नैसर्गिक शेती तज्ञ श्री.विकास गोडसे यांनी उपस्थितांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.त्यांनी बिजामृत, जीवामृत,घन जीवामृत तसेच कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निमार्क,अग्न्यास्त्र,ब्रम्हास्त्र आणि निमास्त्र तयार करण्याच्या पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन केले.विशेषतः त्यांनी मांडलेली ‘दहा ड्रम थेअरी’ ही उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. या कार्यशाळेस उपविभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये श्री.आबासाहेब देशमुख (तालुका कृषी अधिकारी),श्री. ज्ञानेश्वर रितापुरे,श्री.महेश देवकते, श्री.राहुल दिवाने यांच्यासह सर्व मंडळ कृषी अधिकारी,उपकृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यशाळेमुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असून,नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. *****