Monday, 31 August 2026

नवरात्रात भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे निर्देश

नवरात्रात भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे निर्देश * तुळजापुरात २२ प्रथमोपचार केंद्रे, * २८०० पोलिसांचा बंदोबस्त * अखंडित वीजपुरवठा,स्वच्छ पाणी,मोबाईल टॉयलेटसह आरोग्य-सुरक्षेवर विशेष भर धाराशिव दि.३१ ऑगस्ट (जिमाका) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांना सुरक्षित,सुलभ आणि सुविधापूर्ण दर्शनाचा अनुभव मिळाला पाहिजे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही,यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसात समन्वय ठेवून नियोजनातील प्रत्येक बाब काटेकोरपणे पूर्ण करावी.स्वच्छता,आरोग्य,पिण्याचे पाणी,वीजपुरवठा,वाहतूक आणि सुरक्षेच्या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू देऊ नका,असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अधिकाऱ्यांना दिले. श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे.परंपरेनुसार त्याआधी ३ ऑक्टोबर रोजी देवींची मंचकी निद्रा सुरू होणार असून,११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे.महोत्सव काळात भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज ३१ ऑगस्ट रोजी सैनिकी विद्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत महोत्सवाच्या पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. २४ तास अखंडित वीज; रस्त्यांची दुरुस्ती नवरात्र काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत विभागाकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे. वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार नाही,यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांना रस्त्यांवरील अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.त्याचबरोबर भाविकांना इच्छित स्थळी सहज पोहोचता यावे यासाठी आवश्यक ठिकाणी दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे भाविकांच्या आरोग्य सुरक्षेवर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.आरोग्य विभागाच्या वतीने शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत.महोत्सव काळात साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी साथरोग नियंत्रण पथके नियुक्त केली जाणार आहेत.गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी बाईक ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात येणार आहेत. २०० मोबाईल टॉयलेट; विश्रामकक्ष,लॉकरची सुविधा नगर परिषदेच्या वतीने महोत्सव काळात शहरात भाविकांसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये मंडप उभारणी,घाटशीळ येथे दर्शन मंडप,चप्पल स्टँड,लॉकर सुविधा,भवानी कुंड येथे स्नानगृह तसेच शहरात विविध ठिकाणी भाविकांसाठी विश्रामकक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शहरात भाविकांच्या सोयीसाठी २०० मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार असून,पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.भवानी कुंड परिसरातही स्वतंत्रपणे शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. खवा, पेढे, दूध आणि तेलाच्या नमुन्यांची तपासणी महोत्सव काळात भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत राहणार आहेत. शहरातील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर काटेकोर देखरेख ठेवण्यात येणार आहे. शहरातील अन्न विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करून स्वच्छता नियमावलीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याचबरोबर विक्री होणाऱ्या खवा, पेढे,दूध व तेलाचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे.भाविकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही,यासाठी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. २८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महोत्सव काळात तब्बल २ हजार ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र पोलिस पथके कार्यरत राहणार आहेत.शारदीय नवरात्र महोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी आणि भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पोलिस विभागाच्या वतीने वाहतूक मार्गात आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. “शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूरमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात.त्यामुळे प्रत्येक विभागाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडावी. भाविकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून स्वच्छता,आरोग्य सुविधा,शुद्ध पिण्याचे पाणी,अखंडित वीजपुरवठा आणि सुरळीत वाहतुकीची व्यवस्था चोख असली पाहिजे.सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करून भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे जिल्हाधिकारी पुजार यांनी बैठकीत सांगितले. एकूणच,श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसह स्वच्छता,आरोग्य आणि विविध सोयी- सुविधांवर जिल्हा प्रशासनाने विशेष भर दिला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकी विद्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला पोलिस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, तहसीलदार अरविंद बोळंगे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.रणदिवे श्री तुळजापूर मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने,महंत हमरोजी बुवा,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे,अमरराजे कदम,आपसिंगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ******