Tuesday, 1 September 2026

‘खेलेगा भारत,जितेगा भारत’चा धाराशिवमध्ये जागर

‘खेलेगा भारत,जितेगा भारत’चा धाराशिवमध्ये जागर राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव मेजर ध्यानचंद यांना आदरांजली धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) मैदानावर घाम गाळत ध्येयाचा पाठलाग करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतानाच नव्या पिढीत खेळाची आवड निर्माण करण्याचा संदेश धाराशिवमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देण्यात आला.महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करत ‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ या संकल्पनेतून तीन दिवस विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.यानिमित्त आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला,तर जिम्नॅस्टिक्स आणि तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा एकविध क्रीडा संघटना,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो.सन २०२६ मधील राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना ‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ अशी होती. आदर,खेळ आणि हालचाल (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम,क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘२९ आव्हाने’मधून खेळाडूंनी दाखविले कौशल्य राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपक्रमांना २८ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ‘२९ आव्हाने’ (29 Challenges) या उपक्रमांतर्गत खेळाडूंनी आपापल्या खेळातील कौशल्याचे २९ वेळा आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुश-अप्स,सिट-अप्स,शटल रन आदींची प्रात्यक्षिके खेळाडूंनी सादर केली.त्याचबरोबर ‘पास द बॉल चॅलेंज’ अंतर्गत मैदान आणि विविध क्रीडा अकादमींमधील खेळाडूंनी एकमेकांकडे चेंडू पास करण्याचे आव्हान पूर्ण केले.या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सांघिक भावना आणि खेळातील सहभागाचा संदेश देण्यात आला. मेजर ध्यानचंद,खाशाबा जाधव यांना अभिवादन २९ ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त श्रीमती.रोहिणी आवारे,आर्चरी संघटनेचे सचिव प्रवीण गडदे,तलवारबाजी संघटनेचे सचिव श्रीकांत गरड,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती.सुप्रिया गाढवे,डॉ.देडे,अविनाश थोरबोले,यशोदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद आणि भारताचे ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘खेळातून आयुष्यात अनेक संधी’ शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रोहिणी आवारे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कार्याची माहिती दिली.त्याचबरोबर जीवनातील खेळाचे महत्त्व आणि क्रीडा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींविषयी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागील उद्देश आणि त्याचे महत्त्व विशद केले.खेळ आणि शारीरिक सक्रियता दैनंदिन जीवनाचा भाग होण्याचे महत्त्वही यानिमित्त अधोरेखित करण्यात आले. जिम्नॅस्टिक्स अन् तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष कार्यक्रमात जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी श्रीमती.डिंपल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली.तसेच श्रीधर सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.खेळाडूंचे कौशल्य,वेग आणि तंत्र यामुळे या प्रात्यक्षिकांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुणवंत खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले,तर क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार यांनी उपस्थितांचे आभार मानले. ******