Monday, 31 August 2026
रोजगार महाकुंभातून तरुणाईला मिळणार करिअरची नवी वाट धाराशिवमध्ये २९ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
रोजगार महाकुंभातून तरुणाईला मिळणार करिअरची नवी वाट
धाराशिवमध्ये २९ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) शिक्षण पूर्ण झाले,हातात कौशल्यही आहे,मात्र योग्य नोकरीची संधी कुठे मिळेल, कोणत्या उद्योगात आपल्या पात्रतेला वाव आहे आणि रोजगारदात्यांपर्यंत पोहोचायचे कसे,असे अनेक प्रश्न नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण- तरुणींसमोर असतात.या प्रश्नांची उत्तरे एकाच व्यासपीठावर मिळवून देत जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिवमध्ये ‘रोजगार महाकुंभ’ (पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मंगळवार,दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.
हा उपक्रम केवळ पारंपरिक रोजगार मेळाव्यापुरता मर्यादित राहणार नाही.उद्योग,रोजगारदाते, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि रोजगाराच्या अपेक्षेतील उमेदवार यांना एका प्रभावी व्यासपीठावर आणणारा हा व्यापक उपक्रम असणार आहे.त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांना थेट संधी उपलब्ध होण्याबरोबरच उद्योगांनाही त्यांच्या गरजेनुसार आवश्यक मनुष्यबळ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सर्व आस्थापना आणि उद्योगांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि जिल्ह्यातील विविध आस्थापनांच्या संयुक्त विद्यमाने पात्रताधारक बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी या ‘रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे.
रिक्त पदांची माहिती देण्याचे उद्योगांना आवाहन
या मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक उद्योग व आस्थापनांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.विविध आस्थापना,उद्योग समूह आणि व्यावसायिक संस्थांकडे उपलब्ध असलेल्या पुरुष व महिलांसाठीच्या रिक्त पदांची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित उद्योग आणि आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सोबत देण्यात आलेल्या गुगल फॉर्मद्वारे भरून द्यावी,तसेच सोबत दिलेल्या विहित नमुन्यात ती माहिती या कार्यालयास कळवावी,अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे रोजगार महाकुंभात सहभागी होणाऱ्या आस्थापनांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
एका बाजूला शिक्षण आणि कौशल्य असूनही योग्य संधीच्या प्रतीक्षेत असलेली तरुणाई,तर दुसऱ्या बाजूला प्रशिक्षित आणि पात्र मनुष्यबळाच्या शोधात असलेले उद्योग—या दोघांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न या रोजगार महाकुंभातून होणार आहे. त्यामुळे २९ सप्टेंबरचा ‘रोजगार महाकुंभ’ जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक- युवतींसाठी रोजगाराची नवी दारे उघडणारा ठरणार आहे.
जिल्ह्यातील उद्योग,आस्थापना आणि व्यावसायिक संस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद देऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती सादर करावी व रोजगार महाकुंभात सहभागी व्हावे,असे आवाहन धाराशिव येथील जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
*******