Tuesday, 1 September 2026
अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ‘पीएमएफएमई’चा लाभ घ्या
अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ‘पीएमएफएमई’चा लाभ घ्या
उद्योगासाठी ३५ टक्के अनुदान ; बेरोजगारांसह शेतकरी,बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही संधी
धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) शेतात पिकणाऱ्या कच्च्या मालाची थेट विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणल्यास त्याचे मूल्य वाढते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडू शकते. त्याचबरोबर ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) जिल्ह्यात रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी महत्त्वाची ठरत आहे.योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ५३७ जणांचे प्रस्ताव मंजूर झाले असून,त्यापैकी ४५० अन्नप्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत.
जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या सातत्याने जाणवत असून अनेक शिक्षित युवकांच्या हातांना रोजगार उपलब्ध होत नाही.स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची इच्छा असूनही पुरेशा भांडवलाअभावी अनेकांना उद्योग उभारणे शक्य होत नाही.अशा युवकांसह शेतकरी आणि विविध समूहांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेमुळे कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करता येत असल्याने उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे योजनेत एकूण पात्र प्रकल्प खर्चावर ३५ टक्के अनुदान उपलब्ध असल्याने उद्योग उभारणीसाठी आर्थिक आधार मिळतो.
खवा, गूळ, डाळीपासून मसाला-पापडापर्यंत उद्योग
PMFME योजनेअंतर्गत २०२०-२१ पासून चालू वर्षापर्यंत धाराशिव जिल्ह्यात ५३७ जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.त्यापैकी ४५० उद्योग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.यामध्ये खवा उद्योग,गूळ उद्योग,डाळ उद्योग,बेदाणा प्रक्रिया,मसाला आणि पापड उद्योग यांचा समावेश आहे.स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे.असंघटित व अनोंदणीकृत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बळकटी देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारता येतात.
अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही आर्थिक उन्नती साधण्याची संधी आहे.शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास कच्चा माल थेट विकण्याच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळविण्याची शक्यता निर्माण होते.
योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक उद्योजकांपुरता मर्यादित नाही. वैयक्तिक लाभार्थी, बचत गट, शेतकरी गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच ॲग्रो कंपनी यापैकी पात्र घटकांना अर्ज करता येतो.विशेष म्हणजे,योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक नाही. त्यामुळे स्वतःची जमीन नसतानाही पात्र व्यक्तींना अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे.
प्रस्तावापासून मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन
योजनेचा प्रस्ताव तयार करताना किंवा अर्ज प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी शासनाकडून मदत केली जात आहे.प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मानधन तत्त्वावर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.अर्जदारांना प्रस्ताव दाखल करण्यापासून त्याच्या मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन करण्यात येते.उद्योग मंजूर झाल्यानंतर तो व्यवस्थित चालविण्यासाठी शासनाकडून योजनेच्या निकषांनुसार ३५ टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांचीही मदत घेता येईल.
जिल्ह्यात विविध प्रकारचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.मात्र त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने बाजारात विकणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे.त्यामुळे जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग वाढल्यास स्थानिक शेतमालाला बाजारपेठ मिळण्याबरोबरच नवउद्योजकांनाही उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासोबतच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व्यक्ती,शेतकरी,बचत गट,शेतकरी गट,संस्था आणि कंपन्यांनी योजनेसाठी अर्ज करून लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विभाग,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्ज कुठे करायचा-
अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (pmfme.mofpi.gov.in) भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधता येईल.तसेच गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडूनही योजनेबाबत मार्गदर्शन घेता येईल.
******