Tuesday, 1 September 2026

अखेर प्रतीक्षा संपली... दत्तक प्रक्रियेतून पालकत्वाच्या इच्छेला मिळाले कायदेशीर बळ

अखेर प्रतीक्षा संपली... दत्तक प्रक्रियेतून पालकत्वाच्या इच्छेला मिळाले कायदेशीर बळ नात्याअंतर्गत दत्तक प्रकरणात अंतिम आदेश ; जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने प्रक्रिया पूर्ण CARA मार्गदर्शिकेनुसार गृहचौकशी,कागदपत्रांची पडताळणी आणि सुनावणीनंतर आदेश पारित धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) आई होण्याची इच्छा... बाबा होण्याचे स्वप्न... मनात जपलेल्या पालकांची प्रतीक्षा अखेर सोमवारी संपली.नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेतून एका बालकाला कायदेशीररीत्या स्वीकारण्याच्या त्यांच्या इच्छेला अंतिम आदेशामुळे बळ मिळाले.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मान्यतेने नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रियेतील एका प्रकरणात आज सोमवारी १ सप्टेंबर रोजी अंतिम आदेश पारित करण्यात आला.या प्रक्रियेत नात्याअंतर्गत दत्तक प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरली.दत्तक प्रक्रिया ही केवळ बालक स्वीकारण्याची प्रक्रिया नसून त्याला कायदेशीर मान्यता मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे निर्धारित नियम, कागदपत्रांची पडताळणी, गृहचौकशी,संबंधित यंत्रणांची मान्यता आणि सुनावणीचे टप्पे पूर्ण करून या प्रकरणात अंतिम आदेश देण्यात आला. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने हलविली सूत्रे या प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांनी प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक प्रक्रियेच्या कामकाजाची सूत्रे हलविली.प्रथमदर्शनी दत्तक प्रणालीच्या मार्गदर्शिकेनुसार संबंधित पालकांना केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या (CARA) संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगण्यात आले.त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गृहचौकशी करण्यात आली. या प्रक्रियेत बाल संरक्षण अधिकारी श्रीमती.विभावरी खुने यांनी दत्तक इच्छुक पालकांकडून आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेतली.तसेच दत्तक घेणारे, दत्तक देणारे आणि साक्षीदार यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.बाल कल्याण समितीच्या मान्यतेनंतर पुढील प्रक्रिया संबंधितांना बाल कल्याण समिती,धाराशिवचे अध्यक्ष विजयकुमार माने आणि समितीच्या इतर सदस्यांसमक्ष हजर करण्यात आले.बाल कल्याण समितीच्या मान्यतेनंतर पुढील दत्तक प्रक्रिया करण्यात आली. त्यानुषंगाने CARA मार्गदर्शिका- २०२२ नुसार या एका प्रकरणासाठी CARA मार्फत आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात सुनावणी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या कक्षात प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.सुनावणी आणि आवश्यक प्रक्रियेनंतर या दत्तक प्रकरणात अंतिम आदेश पारित करण्यात आला.या दत्तक विधानाची प्रक्रिया विधी व परिविक्षा अधिकारी श्रीमती.जयश्री भाले यांच्या कायद्यांतर्गत मार्गदर्शनातून पार पडली. दत्तक प्रक्रियेतील विविध टप्प्यांची काटेकोर पूर्तता झाल्यामुळे पालकत्वाची इच्छा मनाशी बाळगून असलेल्या संबंधित पालकांसाठी हा दिवस विशेष ठरला.त्याचबरोबर कायदेशीर प्रक्रियेतून दत्तक घेण्याचे महत्त्वही या प्रकरणामुळे अधोरेखित झाले. दत्तक घ्यायचे असेल तर कायदेशीर प्रक्रियाच अवलंबा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने नागरिकांना दत्तक प्रक्रियेबाबत महत्त्वाचे आवाहन केले आहे.नात्याअंतर्गत दत्तक,सावत्र दत्तक प्रकरण तसेच नियमित दत्तक ग्रहणासाठी बालक दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दत्तक घेण्याची प्रक्रिया अधिकृत यंत्रणेमार्फत आणि कायदेशीर पद्धतीने पूर्ण केल्याने बालकाच्या हक्कांचे संरक्षण होते तसेच दत्तक पालकांनाही कायदेशीर मान्यता आणि संरक्षण प्राप्त होते,त्यामुळे इच्छुक पालकांनी निर्धारित दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी केले आहे. ******