Thursday, 3 September 2026

महसुली वाद मिटविण्याची संधी : ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ शेतकरी,नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार

महसुली वाद मिटविण्याची संधी : ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ शेतकरी,नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार धाराशिव दि.३ सप्टेंबर (जिमाका) वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसुली दावे आणि अपिलांच्या फेऱ्यांत अडकलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आता आपापसातील तडजोड आणि सहमतीने वाद कायमस्वरूपी मिटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महसूल विभागाकडील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यास मान्यता दिली आहे.१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झालेले हे अभियान ३१ मार्च २०२७ पर्यंत सात महिने राबविण्यात येणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा महसुली दावे व अपिलांसाठी खर्च होणारा वेळ आणि पैसा वाचविणे,तसेच महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोड व सहमतीने जलदगतीने निकाली काढणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.जिल्ह्यात मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दावे आणि अपिलांसंदर्भात हे अभियान राबविण्यात येणार आहे. ७ ऑक्टोबर,९ डिसेंबरला लोकअदालत जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर ७ ऑक्टोबर २०२६ आणि ९ डिसेंबर २०२६ रोजी महसूल लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशासनाने निश्चित कार्यपद्धती आखली आहे. दोन्ही पक्षकारांना संयुक्त अर्ज करता येणार ज्या न्यायालयात किंवा कार्यालयात महसुली दावा प्रलंबित आहे,तेथे संबंधित दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील संयुक्तपणे विहित ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज करू शकतील.‘प्रपत्र-अ’ संबंधित कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित यंत्रणेकडून छाननी केली जाईल.दोन्ही पक्षांची तडजोडीसाठी संमती असल्याची खात्री करण्यात येईल.त्यानंतर त्यांच्याकडून कायदेशीर तडजोडनामा (Consent Terms) लिहून घेतला जाईल. तडजोडीनंतर अंतिम आदेश निश्चित केलेल्या लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षकारांच्या उपस्थितीत तडजोडीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर अंतिम आदेश पारित करून संबंधित प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार आहे.त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित महसुली वाद परस्पर सहमतीने सोडविण्यासाठी नागरिकांना या अभियानाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन महसुली दावे आणि अपिले तडजोडीने निकाली काढू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा.त्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित अर्ज दाखल करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले आहे. ******