Monday, 31 August 2026
पीककर्जाचा हातभार ; खरीप हंगामात धाराशिवच्या ६६ हजार ६८२ शेतकरी खात्यांना आधार
पीककर्जाचा हातभार ; खरीप हंगामात धाराशिवच्या ६६ हजार ६८२ शेतकरी खात्यांना आधार
३० ऑगस्टपर्यंत ६८८ कोटी ३० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप ; जिल्ह्याची उद्दिष्टपूर्ती ४३.१४ टक्के
धाराशिव दि.१ सप्टेंबर (जिमाका) पेरणीसाठी बियाणे,खते,औषधे, मजुरीपासून ते पीक हातात येईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला पैशांची गरज भासते. अशा वेळी वेळेत मिळणारे पीककर्ज हे केवळ बँकेकडून मिळणारे अर्थसाह्य राहत नाही,तर संपूर्ण हंगामाचे आर्थिक गणित सांभाळणारा महत्त्वाचा आधार ठरतो.यंदाच्या खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यात ३० ऑगस्टपर्यंत विविध बँकांनी ६६ हजार ६८२ शेतकरी खात्यांना ६८८ कोटी ३० लाख रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. जिल्ह्याला निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ४३.१४ टक्के आहे.ही आकडेवारी जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाने दिली.
धाराशिव हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला जिल्हा.खरीप हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यापुढे मशागत,बियाणे,खते, कीटकनाशके,तणनियंत्रण,मजुरी अशा खर्चांची मालिका उभी राहते. विशेषतः अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या उपलब्ध रकमेतून हा सर्व खर्च करणे कठीण असते.त्यामुळे वेळेवर आणि संस्थात्मक व्यवस्थेतून मिळणाऱ्या पीककर्जाला त्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.कर्जाची रक्कम वेळेत हातात पडल्यास शेतीच्या आवश्यक कामांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचा ताण काही प्रमाणात हलका होतो.
उद्दिष्ट १५९५ कोटींचे ; वाटप ६८८ कोटींचे
जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बँकांसाठी खरीप पीककर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट १५९५ कोटी ४३ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत ६८८ कोटी ३० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले.एकूण ६८ हजार ४५६ शेतकरी खात्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून,प्रत्यक्ष वितरण ६६ हजार ८६२ खात्यांना झाले आहे.त्यामुळे जिल्ह्याची एकूण उद्दिष्टपूर्ती ४३.१४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
पीककर्ज वितरणात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.या बँकेला ३०३ कोटी १२ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून,१९ हजार ४९ खात्यांना २२० कोटी ४६ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.उद्दिष्टाच्या तुलनेत ही कामगिरी ७२.७३टक्के आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९५ कोटी ७८ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी ३२ हजार ९६२ खात्यांना १६० कोटी ४७ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित केले असून तिची उद्दिष्टपूर्ती ५४.२५ टक्के आहे.
व्यावसायिक बँकांच्या गटाला एकूण ९९६ कोटी ५३ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १५ हजार ५४८ खात्यांना ३०७ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले असून उद्दिष्टपूर्ती ३०.८४ टक्के आहे.खासगी क्षेत्रातील बँकांसाठी ६२ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना ७४९ खात्यांना २४ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
पीककर्जाच्या आकडेवारीकडे केवळ कोटींच्या रकमेतून पाहून चालणार नाही.प्रत्येक मंजूर खात्यामागे एका शेतकरी कुटुंबाच्या हंगामाचे नियोजन असते.पाऊस समाधानकारक झाला तरी बियाणे,खते आणि औषधांसाठी भांडवल नसेल तर वेळेत शेतीची कामे करणे अवघड होते.उलट,कर्ज वेळेवर उपलब्ध झाल्यास शेतकऱ्याला आवश्यक निविष्ठांची खरेदी करता येते आणि हंगामातील महत्त्वाची कामे वेळेत करण्याची संधी मिळते.शेतीत उत्पन्न हंगामाच्या अखेरीस मिळते; मात्र खर्चाची सुरुवात पेरणीच्या आधीपासूनच होते.उत्पन्न आणि खर्चाच्या या कालावधीतील अंतर भरून काढण्यात पीककर्जाची भूमिका महत्त्वाची ठरते.म्हणूनच बँकांच्या तक्त्यातील ६६ हजार ६८२ खाती ही केवळ आर्थिक आकडेवारी नाही,तर ती तितक्याच शेतकरी खात्यांपर्यंत पोहोचलेल्या संस्थात्मक अर्थसाह्याची नोंद आहे.
मात्र,३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्याची एकूण उद्दिष्टपूर्ती ४३.१४ टक्के असल्याने निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत अद्याप मोठा टप्पा बाकी आहे.त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ वेळेत मिळणे आणि बँकांनी निर्धारित उद्दिष्टाच्या दिशेने कर्जवाटपाला गती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
*******