Friday, 7 April 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन


उस्मानाबाद,दि.7:-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि.5 एप्रिल 2017 अन्वये संपूर्ण राज्यामध्ये दि.8 ते 14 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सामाजिक  समता  सप्ताह  साजरा  करण्यात येणार आहे.       
त्यानुसार  जिल्हयामध्ये  पुढीलप्रमाणे  कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात  आले आहे. दि.8 एप्रिल  रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली समता सप्ताहाचे उदघाटन करण्यात येणार आहे. दि.9 एप्रिल रोजी सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्या कडून महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व त्या अंतर्गत कर्जाचे वाटप लाभार्थ्यांना कशा पध्दतीने करण्यात येते याबाबतची माहिती, दि. 10 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व महाविद्यालय, शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच शासकीय अनुदानित वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाटय,प्रश्नमंजूषा,वादविवाद स्पधेंचे आयोजन, दि.11 एप्रिल रोजी आरोग्य अधिकारी व सिव्हील सर्जन यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती प्रसार कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन, दि.12 एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालय व स्वयंसेवी  संस्थाच्या  सहाय्याने  जिल्हयातील  सर्व  महत्वाच्या  ठिकाणी  व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामध्ये स्वच्छता अभियान,दि.13 एप्रिल रोजी सामाजिक कार्यक्षेत्रातील विचारवंत,नामवंत पत्रकार जसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर विविध विषसयाचे व्याख्याने,अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नामवंत लोककलावंत यांचे विविध सामाजिक विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन, दि.14 एप्रिल  रोजी  जिल्हा  स्तरावरील सर्व कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक  समता  सप्ताह  सांगता  होणार आहे.

          तरी जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमामध्ये सहभाग घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या  पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  यांनी केले आहे.